चंद्रपुर:- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत येऊन गेल्यानंतर परमबीर सिंग यांनी आरोप केले, असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. पवारांच्या आरोपाला भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "उद्या हे लोक परमबीर सिंग यांचा मेंदू भाजपनं हॅक केला, असंही म्हणतील", असा खोचक टोला सुधीर मुनगंटीवार यांनी पवार यांना लगावला आहे.
परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी पवार यांनी परमबीर सिंग दिल्लीत येऊन आपल्याला भेटून गेल्याचं सांगितलं. "परमबीर सिंग यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी केलेले आरोप गंभीर आहेत. त्यांनी वसुलीच्या टार्गेटचं पत्राल म्हटलंय पण तो पैसा कुणाला दिला याचा उल्लेख केलेला नाही. फडणवीसही दिल्लीत येऊन गेले होते. ते राज्यात परतल्यानंतरच परमबीर यांनी पत्र लिहिलं", असं पवार म्हणाले.
सुधीर मुनगंटीवार यांनी पवारांनी केलेले आरोप पूर्णपणे फेटाळून लावले. "शरद पवार यांनी फडणवीसांवर केलेल्या आरोपात कोणतंही तथ्य नाही. उद्या हे लोक परमबीर सिंग यांचा मेंदू भाजपवाल्यांनी हॅक केला असंही म्हणतील. त्यामुळे बिनबुडाचे आरोप पवारांनी करू नये. या प्रकरणात आधी अनिल देशमुखांचा राजीनामा घ्यावा आणि त्यानंतरच प्रकरणाची चौकशी करावी", असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.


