काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष रामू तिवारी आणि विद्यमान शहराध्यक्ष संतोष लहामगे यांचा पराभव
ॲंकर:- चंद्रपूर महानगरपालिकेच्या रणसंग्रामाचा निकाल अखेर समोर आला आहे. गेली साडेसात वर्षे या महापालिकेवर एकहाती सत्ता गाजवणाऱ्या भारतीय जनता पक्षाला मतदारांनी मोठा धक्का दिला असून काँग्रेसने मुसंडी मारली आहे. मात्र, हा निकाल केवळ सत्तेच्या परिवर्तनासाठीच नाही, तर अनेक दिग्गजांच्या राजकीय अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे करणारा ठरला आहे.
व्हाईस ओव्हर: चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसने २७ जागा तर कॉंगेस पुरस्कृत ३ जिंकत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे. पण खरी चर्चा रंगली आहे ती पडलेल्या 'बड्या' चेहऱ्यांची.
भाजपचे या निवडणुकीत अक्षरशः पानिपत झाले आहे. माजी महापौर राखी कंचर्लावार आणि अंजली घोटेकर या दोन्ही महिला नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. इतकेच नाही, तर माजी उपमहापौर संदीप आवारी आणि अनिल फुलझेले यांनाही मतदारांनी घरचा रस्ता दाखवला आहे. भाजपच्या या दिग्गज फौजेचा पराभव हा किशोर जोरगेवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
दुसरीकडे, विजयाचा जल्लोष करणाऱ्या काँग्रेसच्या गोटातही चिंतेची लकेर उमटली आहे. काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी यांचा पराभव झाला आहे. तर सर्वात मोठी खळबळ उडाली ती विद्यमान शहराध्यक्ष संतोष लहामगे यांच्या पराभवाने. लहामगे यांना काँग्रेसचेच बंडखोर उमेदवार नंदू नागरकर यांनी धूळ चारली.
चंद्रपूरच्या मतदारांनी एका बाजूला काँग्रेसला कौल दिला असला, तरी दोन्ही पक्षांतील प्रस्थापित नेत्यांना नाकारून बदलाचे स्पष्ट संकेत दिले आहेत. आता महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसला केवळ ४ जागांची गरज असून, शिवसेना उबाठा, अपक्षांची भूमिका कळीची ठरणार आहे.

