Sudhir Mungantiwar : चंद्रपूर महानगरपालिकेत महापौर भाजपाचाच होईल; मित्रपक्ष व अपक्षांशी चर्चा सुरू

Bhairav Diwase
चंद्रपूर:- महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या अटीतटीच्या निवडणुकीत जनतेने भारतीय जनता पार्टीला महत्त्वाची संधी दिली असून, कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही, असे प्रतिपादन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. या निवडणुकीत विकासाला प्राधान्य देणाऱ्या अपक्ष आणि इतर पक्षांच्या नगरसेवकांशी शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी भाजपाला पाठिंबा देण्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

आ. मुनगंटीवार म्हणाले की, “चंद्रपूर महानगरपालिकेच्या जनतेने दिलेला कौल हा विकासासाठी आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी आणि तिला समर्थन देणाऱ्या मित्रपक्षांचा महापौर होईल, याबाबत मला पूर्ण विश्वास आहे.” २०१७ च्या निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले होते, मात्र यावेळी काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीची लढत झाली. तरीही काँग्रेसला बहुमत मिळवण्यात अपयश आले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.


काँग्रेसने निवडणूक निकालापूर्वी बहुमताचे दावे केले होते; मात्र प्रत्यक्ष निकालात ते बहुमतापासून वंचित राहिले, असे सांगत आ. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले की, चंद्रपूर शहराच्या विकासासाठी सक्षम, स्थिर आणि विकासाभिमुख नेतृत्व देण्यास भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे. जनतेच्या विश्वासावर खरे उतरून शहराच्या प्रगतीसाठी पुढील काळात ठोस निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी नमूद केले.