Chandrapur News: सुभाष कासनगोट्टूवार यांच्यावर गुन्हा दाखल होणार?

Bhairav Diwase

बोगस पट्टे वाटप प्रकरण तापले; महापालिकेचे पोलिसांना थेट आदेश, विरोधक आक्रमक
चंद्रपूर:- शहरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उघडकीस आलेल्या बोगस पट्टे वाटप प्रकरणामुळे राजकीय वातावरण अक्षरशः स्फोटक बनले आहे. भाजपचे निलंबित शहराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांनी सरकारी कार्यालयीन शिक्क्यांची बनावट कागदपत्रे वापरून गरिब नागरिकांना कायमस्वरूपी पट्ट्यांचे आमिष दाखवल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, या प्रकरणात आता त्यांच्या अटकेची शक्यता बळावली आहे. विरोधकांच्या तीव्र दबावानंतर चंद्रपूर महानगरपालिकेने स्वतः पुढाकार घेत पोलिस प्रशासनाला थेट कायदेशीर कारवाई करण्याचे पत्र दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी या प्रकरणात थेट आक्रमक भूमिका घेत सुभाष कासनगोट्टूवार यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे. सरकारी यंत्रणेचे बनावट शिक्के वापरून सामान्य, गरिब जनतेची फसवणूक करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालता येणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. हा प्रकार केवळ निवडणूक आचारसंहितेचा भंग नसून शासकीय व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर घाला घालणारा गंभीर गुन्हा असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले.


चंद्रपूर शहरातील राजू नगर परिसरात मतदानाच्या अगदी तोंडावर काही नागरिकांना तथाकथित कायमस्वरूपी पट्ट्यांची कागदपत्रे देण्यात आल्याचे समोर आले. तक्रारदार राहुल भोयर यांनी १० जानेवारी २०२६ रोजी यासंदर्भात अधिकृत तक्रार दाखल केली होती. नागरिकांनी थेट सुभाष कासनगोट्टूवार यांनीच ही पत्रे दिल्याचे जबाबात सांगितल्याचेही तपासात समोर आले आहे.


महानगरपालिकेच्या उपायुक्तांनी १२ जानेवारी २०२६ रोजी रामनगर पोलीस ठाण्याला पाठवलेल्या पत्रात सर्व शिक्के बनावट असल्याचे नमूद करत दोषींविरुद्ध तात्काळ फौजदारी व प्रशासकीय कारवाई करण्याची स्पष्ट मागणी केली आहे. त्यामुळे यावर चौकशी होऊन सुभाष कासनगोट्टूवार यांच्यावर गुन्हे दाखल होण्याची शक्यता वाढलेली आहे.


खा. धानोरकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि महानगरपालिका आयुक्त यांची प्रत्यक्ष भेट घेऊन गुन्हा तात्काळ नोंदवण्याची मागणी केली. यावेळी माजी मंत्री वसंत पुरके, काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांच्यासह काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानेही या प्रकरणात आक्रमक पवित्रा घेत अटक न झाल्यास मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.


निवडणूक आचारसंहिता लागू असताना सरकारी पदाचा व शिक्क्यांचा गैरवापर करून मतदारांना प्रलोभन देणे हा थेट लोकशाही प्रक्रियेवर हल्ला असल्याचा आरोप होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो, व्हिडिओ आणि नागरिकांचे जबाब हे या कथित गुन्ह्याचे ठोस पुरावे असल्याचा दावा केला जात आहे. भारतीय न्याय संहितेनुसार हा प्रकार फसवणूक, बनावट कागदपत्रांची निर्मिती आणि शासकीय यंत्रणेची बदनामी या गंभीर गुन्ह्यांच्या चौकटीत बसतो.


महापालिकेच्या पत्रानंतरही पोलिसांकडून कारवाईला विलंब होत असल्याने संशय व्यक्त केला जात असून, कुणाला वाचवण्याचा प्रयत्न होत आहे का, असा थेट सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. आता या प्रकरणात सुभाष कासनगोट्टूवार यांची अटक होते की राजकीय दबावाखाली प्रकरण लांबवले जाते, याकडे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.