मजुरांनी रोजी कमी पडत असल्याने केली तक्रार, मजुरांची आपबीती ऐकून बसला धक्का.
नागभीड:- महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमाची अंमल बजावणी १९७७ पासून महाराष्ट्रात सुरू झाली. सध्या स्थितीत महाराष्ट्रात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू आहे. नागभीड तालुक्यातील पान्होळी गावाबाहेर सुरू असलेल्या तलावावरील रोजगार हमी च्या कामांवर जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले व जिल्हा परिषद सदस्य संजय गजपुरे यांनी अचानक भेट दिल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. अनेक मजुरांनी यावेळी रोजी कमी पडत असल्याची तक्रार केली.
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्याने दिवस भर काम करायला त्रास होतो पण परिस्थिती हलाखीची असल्याने व पोटाची खळगी भरण्यासाठी काम करावे लागते. पण काम करुनही कमी रोजी निघत असल्याचे उपस्थित सर्वच व विशेषत: महिला मजुरांनी यावेळी सांगितले. विशेष करून जिल्हा परिषद अध्यक्षा तिथे पोहचल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. पण महिलांची आपबीती ऐकून शेवटी अध्यक्षांचेही डोळे पाणावले. पान्होळी येथील कामावर २०० हुन अधिक मजुर कामावर होते.
उपस्थित मजुरांशी चर्चा करून त्यावर लवकर तोडगा काढू असे आश्वासन जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले व जिल्हा परिषद सदस्य संजय गजपुरे यांनी यावेळी दिले.