राज्यात 11 एप्रिल रोजी होणारी MPSC परीक्षा पुढे ढकलली.

Bhairav Diwase

Bhairav Diwase.         April 09, 2021
मुंबई:- राज्यात 11 एप्रिल रोजी होणारी राज्य सेवा परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना 11 एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी सर्व स्तरातून होत होती. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बैठक बोलावली होती. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि अधिकारी यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमार्फत ही बैठक पार पडली. त्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.


महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवारी म्हणजेच 11 एप्रिलला महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा होणार परंतु, या परीक्षेवर अनिश्चिततेचं सावट होतं. मात्र, परीक्षेबाबत सरकारकडून एमपीएससी प्रशासनाला कोणतीही सूचना मिळालेली नव्हती. त्यातच राज्य सरकारने 30 एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध लावले असून शनिवारी आणि रविवारी असे दोन दिवस पूर्णपणे लॉकडाऊन आहे. त्यामुळे परीक्षा 11 एप्रिलला होणार का असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, आता ही परीक्षा होणार नसल्याचे निश्चित झाले आहे.


दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. यासंदर्भात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना फोन करुन एमपीएससीची संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याबाबत चर्चा केली होती. दरम्यान मागील महिन्यातच एमपीएससीची पूर्व परीक्षा पुढे ढकलल्यामुळे पुण्यात विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केलं होतं. मात्र, आता विद्यार्थ्यांची भूमिका पूर्णपणे बदलल्याचं चित्र आहे. कोरोना संसर्गामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनीही केली होती.