(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
नागभीड:- विनीत क्रिष्णा रामटेके (३) असे या मृत चिमुकल्याचे नाव आहे. गुरुवारी संध्याकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान चिमुकल्या विनीतची आई राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या तपाळ योजनेच्या जोडावरील नळावर पाणी भरण्यासाठी आली होती. आईच्या नकळत आईच्या मागोमाग हा चिमुकलाही नळावर येत होता. नळावर असलेल्या आईजवळ जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असतानाच ब्रम्हपुरीकडे जात असलेल्या एका मोटारसायकलखाली हा चिमुकला आला आणि गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, अशी माहिती आहे.
ही बाब आजूबाजूला असलेल्यांच्या लक्षात येताच लागलीच या चिमुकल्याला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्याला झालेली गंभीर दुखापत लक्षात घेता प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले.
मात्र उपचार सुरू असतानाच रात्री उशिरा या चिमुकल्याचा मृत्यू झाला. यासंदर्भात नागभीड पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.