Bhairav Diwase. April 04, 2021
मुंबई:- मागील काही दिवसांत करोनानं अक्षरक्षः थैमान घातल्यानं राज्य सरकारची झोप उडाली आहे. प्रचंड वेगानं होत असलेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य सेवेवर ताण येण्यास सुरूवात झाली असून, रुग्णांचे हाल टाळण्यासाठी आणि विषाणू संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून लॉकडाउन संदर्भात चाचपणी सुरू होती. सर्वच क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.राज्यात संपूर्णपणे नसला तरी अंशत: लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. राज्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून शनिवार आणि रविवारी संपूर्ण राज्यात कडकडीत बंद राहणार असल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. बैठकीत राज्यात करोनाचं संक्रमण रोखण्यासाठी कठोर निर्बंध घालण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी निर्णयांची माहिती दिली. राज्यात उद्यापासून कडक नियम लागू होणार असून, रात्री ८ वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी असणार असून, दिवसा १४४ कलम लागू (जमावबंदी) असेल, असं मलिक यांनी सांगितलं.
काय काय बंद राहणार......
राज्यात विकेंड लॉकडाऊनच्या काळात राज्यात गार्डन, चौपाट्या, धार्मिक स्थळे बंद राहतील. तसेच सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमही बंद राहणार आहेत. फक्त पुजाऱ्यांना मंदिरात पूजा करण्यासाठी मुभा देण्यात आल्याचं मलिक यांनी सांगितलं.
नवाब मलिक काय म्हणाले?
शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत कठोर लॉकडाऊन लागू असेल. हा निर्णय एकमताने झालाय. निर्णय घेण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेत्यांशी, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशीही चर्चा केलीय, असं मलिक म्हणाले. तसेच मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनबाबत हॉटेल व्यावसायिक, उद्योजक, जीम चालक आणि सिनेसृष्टीतील दिग्गजांशीही चर्चा केल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात कोरोना वाढत असताना एकजुटता दिसली पाहिजे, त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी राजकीय नेते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
शुक्रवार रात्री 8 ते सोमवार सकाळी 7 पर्यंत लॉकडाऊन.....
काय सुरु.....
अत्यावश्यक सेवा सुरू राहणार
दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी राहणार
गृहनिर्माणची सर्व कामे सुरू
ऑफिस50 % क्षमतेने सुरू
दुकान आणि हॉटेल मध्ये पार्सल सेवा सुरू राहणार
रिक्षा टॅक्सी खाजगी बसेस सुरू राहणार
मुंबई लोकल वाहतूक सुरू राहणार
सर्व ट्रान्सपोर्ट व्यवस्था सुरु राहणार, मास्क बंधनकारक, क्षमतेपेक्षा 50 टक्क्याने सर्व सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार
काय बंद.....
भाजी मंडई बंद राहणार
बार हॉटेल मॉल बंद राहणार
सर्व मैदाने आणि सभागृह बंद राहणार
सर्व धार्मिक स्थळे बंद राहणार
उद्याने, समुद्रकिनारे, चित्रपटगृह बंद
इंडस्ट्री चालू राहणार, कामगारांवर कुठलेही निर्बंध नाही
दर आठवड्याला शनिवार आणि रविवारी राज्यात कडकडीत बंद राहणार आहे. फक्त यातून अत्यावश्यक सेवा वगळण्या आल्या आहेत.