गडचिरोली:- राज्यात सध्या कोरोनाने धुमाकूळ घातलाय. देशातील सर्वाधिक रुग्ण सध्या महाराष्ट्रात सापडत असून कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारने कलम १४४ लागू करत संचारबंदी जाहीर केलीय. त्यानुसार काही नियम आणि निकष निश्चित करण्यात आले असून लग्नासाठी २५ पेक्षा अधिक नातेवाईकांना एकत्र बोलावण्यास मनाई करण्यात आलीय.
मात्र गडचिरोलीतील एका लग्नात या नियमाची पायमल्ली करण्यात आल्याचं लक्षात आल्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय. गडचिरोली जिल्ह्यात मरकेगाव या ठिकाणी एका लग्नसमारंभासाठी १५० पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र आल्याचं दिसून आलं. त्यानंतर स्थानिक कृती समितीनं पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला आणि वधुवरांच्या आई-वडिल, आचाऱ्यावरही गुन्हा दाखल केला.
ग्रामसेवक, तलाठी, सरपंच आणि इतर सदस्य मिळून कृती समिती तयार होते. अनेकदा स्थानिक हितसंबंध जोपासण्यासाठी कृती समितीकडून अशा प्रकारांकडे काणाडोळा केला जातो. मात्र त्याचे गंभीर परिणाम समाजाला भोगावे लागू शकतात. त्यामुळे आपल्याच गावातील लग्न असूनदेखील नियमांचं पालन करत या कृती समितीनं घेतलेल्या पुढाकाराचं कौतुक केलं जातंय.
सर्व निर्बंध हे केवळ शहरी भागात लागू आहेत आणि ग्रामीण भागात मात्र कुणीच लक्ष देत नाही, असा गैरसमज अनेक सामान्यांचा असतो. त्यामुळे ग्रामीण भागात अनेक ठिकाणी कोरोनाचे नियम पायदळी तुडवण्यात येतात. अशा घटनांमुळे पोलिसांकडे आणि कायद्याचे बघण्याचा सामान्यांचा दृष्टीकोन नक्कीच बदलेल. नियम सगळीकडे सारखेच असून कोरोनाचा पराभव करण्यासठी शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागातील नागरिकांनी त्याचे पालन करणे गरजेचे आहे.