Top News

अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल; CBI ची छापेमारी.


Bhairav Diwase. April 24, 2021
मुंबई:- राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयनं गुन्हा दाखल केला आहे. परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांना पदावरून पायउतार व्हाव लागलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर करण्यात आलेल्या 100 कोटी रुपयांच्या आरोपाची सीबीआयनं चौकशी केली. शनिवारी सकाळी अनिल देशमुख यांच्या घरी सीबीआयने छापेमारी केली. अनिल देशमुख यांच्या मुंबईतील घर आणि इतर मालमत्तांवर सीबीआयनं छापेमारी केली आहे. सीबीआयनं मुंबईत बांद्रा, वरळी तसेच नागपूर येथील दहा ठिकाणी छापेमारी केली आहे. सीबीआयनं चौकशी केल्यानंतर दिल्लीमध्ये अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

वाझे यांच्या मार्फत महिन्याला 100 कोटी रुपये वसुली करण्याचे आदेश दिल्याचा खळबळजनक आरोप परमबीरसिंग यांनी केला होता. पहिल्यांदाच एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडून थेट गृहमंत्र्यांवर वसुलीचा आरोप झाल्यामुळं सरकारला अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यावा लागला. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहचलं होतं. न्यायालयानं याप्रकरणी सीबीआय चौकशीचा आदेश दिला होता. त्यानुसार, सीबीआयन 15 दिवसानंतर अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच मुंबईसह राज्यातील 10 ठिकाणी घर आणि मालमत्तांवर छापेमारी केली आहे.

काय घडलं?
25 फेब्रुवारी रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर एका कारमध्ये जिलेटीनच्या कांड्या सापडल्या. काही दिवसांनी कारचे मालक मनसूख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला. याप्रकरणात मुंबई पोलिस दलातील अधिकारी सचिन वाझे अडकल्यानंतर याप्रकरणाला राजकीय वळण लागले. विरोधीपक्षांनी विधानसभेत आणि बाहेरही हा मुद्दा उचलून धरत, कारवाईची मागणी केली. राज्य सरकारने याची गंभीर दखल घेऊन मुंबई पोलिस आयुक्त पदावरून परमबीरसिंग यांना हटविले. त्यांच्या जागी पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली. या कारवाईनंतर परमबीरसिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावरच खंडणीचे आरोप केले. बार मालक, हुक्का पार्लर यांच्याकडून महिन्याला 100 कोटी रुपये खंडणी गोळा करण्याचे आदेश अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दिले होते, असा आरोप परमबीरसिंग यांनी लगावला. या खंडणीच्या दबावामुळेच वाझेंनी कृत्यं केली का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने