Top News

मुला पाठोपाठ आईचाही कोरोनामुळे मृत्यू.



(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत असलेला २५ वर्षीय सफाई कर्मचारी आणि त्याची आई या दोघांचाही चार दिवसांत कोरोनामुळे मृत्यू झाल्याची हदयद्रावक घटना चंद्रपूर शहरातील पंचशिल वार्डात घडली. एकाच कुटुंबातील मुलगा आणि आईचे निधन झाल्याने त्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

ज्या सफाई कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे त्याच्या वडिलांचे जिल्हा सामान्य रुग्णालयात कर्मचारी असताना दीड वर्षापूर्वी निधन झाले. त्यामुळे त्यांची पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार होता.मुलगी लग्न होऊन सासरी गेली. तिघांच्या कुटुंबांत सर्व जबाबदारी आईवर होती. अखेर वडिलाच्या जागी स्वच्छता कर्मचारी म्हणून मोठ्या मुलाला नोकरी मिळाली. मागील दीड वर्षापासून तो सामान्य रूग्णालयात कोव्हिड योद्धा म्हणून काम करत होता. कोरोना रूग्णांटी सेवा करत असताना त्याला काही दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला. २१ एप्रिलला त्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूचा आईला धक्काच बसला. त्यातचं आईलाही कोरोनाची लागण झाली. तिला सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तिसऱ्या दिवशी शनिवारी २४ एप्रिलला आईची तब्येत बिघडली. रात्रीच्या सुमारास आईनेही कोव्हिड उपचार केंद्रात अखेरचा श्वास घेतला. अवघ्या चार दिवसांत एकाच कुटुंबातील आई आणि मुलाचा मृत्यू झाला. आता त्यांच्या कुटुंबांत लहान भाऊच एकटाच राहिला आहे. तो कोरोना महामारीमुळे पोरका झाला आहे.

कोव्हिड योध्दयांना आर्थिक मदतीची गरज...

चंद्रपुरात कोरोना महामारीची परिस्थिती गंभीर होत आहे. कोरोनाबांधितांचा डॉक्टर, नर्स, सफाई कामगार आणि पोलिसांशी संपर्क येत असतो. सध्याच्या कठीण परिस्थितीत ते सेवा देत आहेत. जिवाची पर्वा न करता सेवा देणाऱ्या कोव्हिड योध्दयांना अशा संकट प्रसंगी भरीव मदत करण्याची गरज आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने