मी हॉस्पिटलमध्ये दाखल आहे, पैश्यांची केली मागणी.
भामट्या विरोधात शहर ठाण्यात गुन्हा दाखल.
यवतमाळ:- "एसपी यवतमाळ" नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करुन मित्रांकडे पैश्यांची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या भामट्याने थेट एसपींना रुग्णालयात दाखल केल्याचे सांगून फेसबुकवरील मित्रांना पैसे मागितले होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर बनावट अकाऊंट बंद करून त्या भामट्या विरोधात शहर ठाण्यात गुन्हा करण्यात आला. सर्वात महत्वाच म्हणजे पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांचाच फोटो बनावट अकाऊंटसाठी वापरण्यात आला.
जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या नावाने 'एसपी यवतमाळ' हे कार्यालयीन फेसबुक अकाऊंट आहे.
रविवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात एका भामट्याने 'एसपी यवतमाळ' नावाने एक नविन फेसबूक अकाऊंट तयार केले. त्यानंतर त्या अकाऊंटवरून मेसेंजरवर चॅटिंग सुरू केली. तत्पूर्वी त्याने जिल्हा पोलीस अधिक्षकांचा फोटो आणि नाव वापरले.
त्यानंतर, या भामट्याने पोलीस अधिक्षकांचे मित्र व नातेवाइकांशी मेसेंजरव्दारे संपर्क साधत आर्थिक अडचणीत आल्याचे सांगितले. मी रुग्णालयात दाखल आहे, मला पैशांची गरज आहे, असं सांगून मित्रांकडून मिळत असलेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर पैश्याची मागणी सुरू केली. गुगल पे असेल तर अर्जंट पैसे पाठवा, असे मेसेज अनेकांना केले.
या प्रकारामुळे एक फेसबुक मित्र गोंधळला आणि त्याने थेट पोलीस अधिकाऱ्यांना याची माहिती देत चौकशी केली. त्यावेळी एसपी यवतमाळ नावाने बनावट अकाऊंट तयार झाल्याची बाब निदर्शनासआली. या प्रकरणामुळे पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी ते बनावट अकाऊंट तात्काळ बंद केले. त्यानंतर यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
शहर पोलिसांनी बनावट अकाऊंट बनवणाऱ्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हे नोंद केले. या प्रकरणी यवतमाळ जिल्हा सायबर सेलचे प्रमुख सहायक पोलिस निरिक्षक अमोल पुरी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सदर बनावट अकाऊंट बंद केले असून या प्रकरणी गुन्हा नोंद केल्याचे सांगितले.