मुंबई:- राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री साडेआठ वाजता फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री आज लॉकडाऊन संदर्भातील घोषणा करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यानं कडक लॉकडाऊन शिवाय पर्याय नसल्याचं ठाम मत उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठकीत व्यक्त केलं होतं. त्यामुळे राज्यात कडक लॉकडाऊनचे संकेतच मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले होते. त्यानंतर कोविड टास्कफोर्स सोबतच्या बैठकीतही कडक लॉकडाऊन करण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजतं.
राज्यात लागू करण्यात येणारा लॉकडाऊन नेमका कसा असेल? काय असेल नवी नियमावली? याकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. राज्यात सध्या विकेंड लॉकडाऊन आणि कडक निर्बंध लागू आहेत. पण त्यालाही व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. अनेक ठिकाणी निर्बंधांचा विरोध व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आज साडेआठ वाजता काय बोलणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.