मनपाचे ४५ खाटांचे कोव्हिड रुग्णालय तातडीने सुरू करा.

Bhairav Diwase
महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे बैठकीत निर्देश.
Bhairav Diwase. April 19, 2021
चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता चंद्रपूर शहर महानगरपालिका विविध उपाययोजना करीत आहे. रुग्णांवर तातडीने उपचार होण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेचे स्वतंत्र ४५ खाटांचे कोव्हिड रुग्णालय बेघर निवारा येथे सुरू करा, असे निर्देश महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी दिले. सोमवारी (ता. १९) महापौर कक्षात कोव्हिडवरील उपाय योजना संदर्भात बैठक पार पडली.

बैठकीला आयुक्त राजेश मोहिते, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, नगरसेवक संजय कंचर्लावार, उपायुक्त विशाल वाघ, शहर अभियंता महेश बारई, मुख्य लेखा अधिकारी संतोष कंदेवार, मुख्य लेखा परीक्षक मनोज गोस्वामी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आविष्कार खंडारे, सहायक आयुक्त धनंजय सरनाईक, डॉ. नरेंद्र जनबंधू उपस्थित होते.

यावेळी महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी शहरातील कोव्हिड परिस्थितीचा आढावा घेतला. मनपाने नव्याने सुरू केलेल्या कोव्हिड केअर सेंटरमधील रुग्ण संख्या, वैद्यकीय सुविधांची माहिती आरोग्य यंत्रणेकडून जाणून घेतली. कोव्हिडची भविष्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी चंद्रपूर शहरात उपाययोजना करण्यासाठी मार्गदर्शक सूचना महापौरांनी केल्या. यावेळी मनपाचे स्वतंत्र कोव्हिड रुग्णालय सुरू करण्यासाठी लवकर कार्यवाही करण्याचे निर्देश महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार हाॅटेल सिद्धार्थमागील मनपाच्या नवीन बेघर निवारा येथे हे कोव्हिड रुग्णालय तात्काळ सुरु करण्यावर एकमत झाले.

रुग्णालय प्रारंभी ४५ खाटांचे राहणार आहे. रुग्णालयासाठी लागणारी आरोग्य यंत्रणा उभारण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचनाही महापौरांनी यावेळी दिल्या. तसेच रुग्णालय सुरू झाल्यानंतर शहरातील रुग्णांवर वेळीच उपचारसेवा देण्यात येईल, असेही महापौर राखी संजय कंचर्लावार सांगितले.

शहरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका विविध उपाययोजना करत आहे. जास्तीत जास्त चाचण्या होण्यासाठी शहरात आर. टी. पी.सी.आर. व अँटीजेन चाचणी केंद्र सुरु करण्यात आले आहे. यात आर.टी. पी.सी.आर. चाचणी केंद्र १. वन आकदमी, मूल रोड २. काईस्ट हॉस्पिटल तुकुम, ३. शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, ४. अभ्यंकर प्राथमिक शाळा बालाजी वॉर्ड, भिवापूर वॉर्ड, ५. सरदार पटेल प्राथमिक शाळा, रामनगर येथे तर अँटीजेन चाचणी केंद्र १. शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्र. १ इंदिरा नगर, २. सरदार पटेल प्राथमिक शाळा रामनगर, ३. शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्र. ४ बगड खिडकी, ४. शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्र. ५ बाबूपेठ येथे सुरु आहेत.

कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसताच त्वरीत चाचणी करण्याचे आवाहन यावेळी महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले.