गडचिरोलीमध्ये सी-60 कमांडोच्या चकमकीत 2 माओवाद्यांचा खात्मा.

Bhairav Diwase
गडचिरोलीमध्ये सी-60 कमांडोच्या चकमकीत 2 माओवाद्यांचा खात्मा.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गडचिरोली:- गडचिरोलीमध्ये गेल्या काही दिवसांपासून माओवाद्यांनी डोके वर काढले आहे. सावरगावा लगत पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक उडाली. चकमकीत दोन माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले आहे.
सावरगाव लगतच्या मोरचुल जंगलात आज सकाळी गडचिरोली पोलिसांच्या सी सिक्स्टी पथकाच्या जवानाचे अभियान सुरू केले आहे. अभियान सुरू असताना माओवाद्यांनी अचानक पथकावर गोळीबार केला. त्याला जवानांनी जशास तसे प्रतिउत्तर दिले. अर्ध्या तासाच्या चकमकीनंतर दोन माओवाद्यांना ठार मारण्यात यश आले आहे. मृतकामध्ये एक पुरुष, एका महिला माओवाद्याचा समावेश आहे. अजूनही या भागात जवानांचे अभियान सुरू आहे.
पोलीस स्टेशनवर माओवाद्यांनी केला होता गोळीबार.....

दरम्यान, गडचिरोलीत माओवाद्यांनी पोलीस ठाण्यावर गोळीबार केल्याची घटना बुधवारी घडली. गडचिरोली जिल्ह्यातील जांबिया गट्टा पोलीस ठाण्यावर काही माओवाद्यांनी गोळीबार केला. माओवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला जवानांनी सुद्धा चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास माओवाद्यांनी जांबिया गट्टा पोलीस ठाण्यावर हल्ला चढवला. मात्र, सतर्क असलेल्या जवानांनी या माओवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत परतवून लावलं आहे. मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार करुन जवानांना सापळ्यात अडकवण्याचा माओवाद्यांचा प्रयत्न जवानांच्या सतर्कतेमुळे फसला. गडचिरोली जिल्ह्यातील घनदाट जंगल अतिदुर्गम भाग असलेल्या या पोलीस ठाण्याला लक्ष्य करण्याचा माओवाद्यांनी गेल्या एका महिन्यात दुसरा प्रयत्न होता. यापूर्वी एप्रिल महिन्यात सुद्धा माओवाद्यांनी अशाच प्रकारे जांबिया गट्टा पोलीस ठाण्यावर गोळीबार केला होता.
एप्रिल महिन्यात माओवाद्यांनी जांबिया गट्टा पोलीस ठाण्यावर गोळीबार केला होता. तसेच ग्रेनेड हल्ला सुद्धा केला होता. यावेळी सुद्धा सतर्क असलेल्या जवानांनी माओवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यास सुरूवात केली. यानंतर माओवाद्यांनी माघार घेत जंगलात पळ काढला होता.