Top News

१८ ते ४५ वयोगटातील नागरीकांच्या लसीकरणासाठी स्थानिकांना प्राधान्य द्या - संजय गजपुरे

नोंदणी करुनही बाहेरचे न आल्याने नागभीड केंद्रावर लसीकरणाची टक्केवारी कमी


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:-चंद्रपुर जिल्हा प्रशासनाने पहिल्या टप्प्यात १८ ते ४५ वयोगटातील नागरीकांच्या लसिकरणासाठी जिल्ह्यातील फक्त ६ ठिकाणीच परवानगी दिली होती. त्यात नागभीड येथील जनता कन्या विद्यालय येथेही लसीकरण केंद्र मंजुर झाल्याने नागभीड परीसरातील नागरीकांच्या आशा पल्लवित होऊन नोंदणी साठी तात्काळ धावपळ केली व अवघ्या काही वेळातच आगामी ७ दिवसाची नोंदणी फुल्ल झाल्याचे लक्षात आले. 
       नागभीडच्या केंद्रावर दररोज २०० याप्रमाणे एकुण १४०० डोजेस उपलब्ध झाले. २ मे पासुन सुरु झालेल्या या केंद्रावर पहिल्या दिवशी फक्त १३७ , दुसऱ्या दिवशी फक्त ११० तर तिसऱ्या दिवशी फक्त १३५ जणांनी लस घेतल्याची माहिती मिळाली . याबाबत जि.प.सदस्य व भाजपा जिल्हा महामंत्री संजय गजपुरे यांनी अधिक माहिती घेतली असता रिक्त राहीलेल्या डोजेसची नोंदणी करणारे हे चंद्रपुर महानगरातील होते. काही अपवाद वगळता नोंदणी करणाऱ्या चंद्रपुर येथील नागरिकांनी १०० किमी. दुर अंतरावर असलेल्या नागभीड केंद्रावर जाणे टाळले व यामुळे  या केंद्रावर १०० टक्के लसीकरण होऊ न शकल्याचे धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली . नागभीडला यायचेच नव्हते तर नोंदणी करुन परीसरातील नागरिकांना वंचीत कशाला ठेवले असा प्रश्न आता नागरीक विचारु लागले आहेत. 
       वस्तुत: नागभीड सारख्या ग्रामीण केंद्रावर लसीकरण करण्यासाठी हे केंद्र मंजुर केले असतांना चंद्रपुरकरांच्या आततायीपणामुळे परीसरातील १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना नोंदणी करता न आल्याने वंचीत रहावे लागले आहे. त्यामुळे १४०० पैकी जवळपास ४०० हुन अधिक डोजेस बाकी राहीले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या वयोगटातील विशेषत: युवक ॲानलाईन नोंदणी साठी पुढे सरसावले असतांना ही माहिती समोर आल्याने परीसरात रोष व्यक्त केल्या जात आहे.
           आता जिल्ह्यातील सर्वच तालुकाकेंद्रावर या वयोगटासाठी केंद्र सुरु झालेले आहेत . त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या नोंदणीसाठी नागभीडच्या जनता कन्या विद्यालयातील लसीकरण केंद्रावर तालुक्यातीलच नागरीकांना परवानगी मिळावी अशी मागणी भाजपा जिल्हा महामंत्री व जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी जिल्हा प्रशासनाला केली असुन जिल्ह्यातील प्रत्येकच केंद्रावर नोंदणीसाठी तालुक्याची सक्ती असावी अशी सुचना केली आहे. यामुळे प्रत्येक तालुक्यातील नागरिकांना नोंदणीसाठी मुभा मिळेल असे मत व्यक्त केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने