प्रवासी वाहन चालक-मालकांच्या आशा पल्लवित.

Bhairav Diwase
भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष इम्रान खान यांचा पुढाकार.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीने व्यावसायिक प्रवासी वाहन चालक-मालकांवर उपासमारीची वेळ आली असून भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष इम्रान खान यांच्या पुढाकाराने त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
मागील एक वर्षापासून टाळेबंदीमुळे खाजगी प्रवासी वाहन व्यवसाय डबघाईस आला. त्यामळे त्यांनी भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष इम्रान खान यांची भेट घेतली. इम्रान खान यांनी पुढाकार घेऊन लगेच आ.सुधीर मुनगंटीवार यांना खाजगी प्रवासी वाहन चालक-मालकांच्या समस्या समजावून सांगितल्या. तसेच या खाजगी वाहन चालक-मालकांनी आ.मुनगंटीवार यांना एक निवेदन सादर केले. या निवेदनाची आ.मुनगंटीवार यांनी तातडीने दखल घेऊन राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आणि परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांना खाजगी प्रवासी वाहन चालक-मालकांच्या समस्या अवगत करुन त्यांच्या मागण्या मान्य करण्याची विनंती केली.
 तसेच तातडीने आॅनलाईन बैठकीचे आयोजन करुन परिवहन आयुक्त ढाकणे यांच्यासोबत चर्चा केली. याशिवाय केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सितारामन, भूतल परिवहन मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तातडीने पत्र पाठवून खाजगी प्रवासी वाहन चालक-मालकांना आर्थिक सहाय्य, करमाफी, विमा मुदतवाढ, बॅंक हफ्त्यांना बिनाव्याजी मुदतवाढ आदी मागण्या पूर्ण करण्याची विनंती केली. 
परिवहन आयुक्त ढाकणे यांनी आॅन लाईन बैठकीत पूर्ण वर्षाचा कर माफ करण्याबाबत आपण त्वरीत शासनाला प्रस्ताव सादर करु असे आश्वासन दिले. शाळा सुरुच न झाल्यामुळे स्कुल बस आणि स्कुल व्हॅन यांच्यावरील कर माफ करण्याबाबत आपण प्रस्ताव पाठविला आहे.अशीही माहिती ढाकणे यांनी यावेळी दिली.
या बैठकीला आ.सुधीर मुनगंटीवार, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष इम्रान खान, भद्रावती येथील खाजगी प्रवासी वाहन चालक-मालक प्रवीण चिमुरकर, हरिदास खोब्रागडे, आशिष कार्लेकर, किशोर बावणे, रतन सुकारे, निलेश कुटेमाटे आणि जिल्ह्यातील इतर चालक-मालक उपस्थित होते.