पंतप्रधानांकडून गुरुवारी चंद्रपुर, अमरावती जिल्ह्यांचा आढावा.

Bhairav Diwase
कोरोना उपाययोजनांबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोरोनाची नेमकी स्थिती जाणून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या २० मे रोजी चंद्रपूर, अमरावती जिल्ह्यांचा आढावा घेणार आहेत.
आतापर्यंत कोरोनावर मात करण्यासाठी या दोन्ही जिल्ह्य़ात करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती यावेळी पंतप्रधान मोदी जिल्हाधिकाऱ्यांकडून जाणून घेतील. राज्यात काही जिल्हे करोनामुळे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. त्यात अमरावती, चंद्रपूरचाही समावेश आहे.
पंतप्रधान मोदी या जिल्ह्य़ातील जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधतील. अमरावतीसाठी २० मे रोजी सकाळी ११ वाजताची वेळ निश्चित असून, तसे पंतप्रधान कार्यालयाने पत्राद्वारे जिल्हा प्रशासनाला कळविले आहे.
अमरावती जिल्ह्य़ातत आतापर्यंत ८० हजारावर करोनाबाधितांची रुग्णसंख्या आढळून आली आहे. १२१३ जणांचे मृत्यू झाले आहे. या पार्श्वभूमीवर मोदी हे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याशी संवाद साधतील. चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याकडूनही ते जिल्ह्याच्या आरोग्यविषयक सोयी-सुविधांचा आढावा घेणार आहेत.