पंतप्रधानांकडे निवेदनाद्वारे आम आदमी पार्टीची मागणी
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- भारतात खतांचे सर्वात जास्त उत्पादन करणा-या इफको कंपनीने यंदा खतांच्या किंमतीत ५५ टक्के वाढ केली असून ही दरवाढ कमी करण्यात यावी, अशी मागणी भद्रावती तालुका आम आदमी पार्टीतर्फे येथील तहसीलदारांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
पंतप्रधानांना पाठविलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, खतांच्या दरवाढीमुळे शेतक-यांपुढे मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे.
मागच्याच महिन्यात इफको कंपनी आणि केंद्र सरकार यांनी खुलासा करत खतांची दरवाढ होणार नसल्याचे सांगितले होते. मग एका महिन्यात चक्रे उलटी का फिरली असा सवाल उपस्थित करत इतर कंपन्याही दरवाढ करण्याच्या तयारीत असल्याची शंका निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.
गेली अनेक वर्षे शेतकरी संकटात आहे. उत्पादन खर्चही मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहे. या पार्श्वभूमिवर केंद्र सरकारने 'शेतक-यांचे उत्पन्न सन २०२२ पर्यंत दुप्पट करु' अशी लोकार्षक घोषणा केली होती. परंतू प्रत्यक्षात त्या दिशेने केंद्र आणि राज्य सरकारने कोणतेच प्रयत्न केले नाही असा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व आर्थिक संकटाच्या काळात खतांच्या किंमती नियंत्रीत करणे किंवा सबसिडी वाढविणे हा पर्याय वापरायला हवा होता. परंतू सरकारने असे काहीही न करता शेतक-यांना धक्का दिला.असाही आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.महामारी, त्यातच पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा फटका बसलेला असताना ही खतांची दरवाढ थांबविण्याचे आदेश कंपन्यांना द्यावेत.अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदन सादर करताना आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष सोनल पाटील, उपाध्यक्ष विनीत निमसरकर, किशोर गायकवाड आणि सूरज पेंदोर उपस्थित होते.