'त्या' पोलिस अधिका-यांवर गुन्हे दाखल करुन बडतर्फ करा.

Bhairav Diwase
चंद्रपूर जिल्हा भाजयुमोची मागणी; मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- जालना येथील मागासवर्गीय युवक व भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले यांना अमानुषपणे बेदम मारहाण करणा-या सर्व पोलिस अधिकारी व कर्मचा-यांवर गुन्हा दाखल करुन त्यांना सेवेतून तात्काळ बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी भाजयुमोचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष इम्रान खान यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
येथील तहसीलदार महेश शितोळे यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जालना येथील भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले हे त्यांच्या बहिणीची प्रकृती ठीक नसल्याने एका रुग्णालयात गेले. तेथे गवळी समाजाच्या एका युवकाचा अपघाताने मृत्यू झाला होता. तेथे पोलिस मृतकांच्या नातेवाईकांना आणि गवळी समाजाला अपशब्द वापरुन शिवीगाळ करीत होते. हा प्रकार शिवराज यांना सहन झाला नाही. त्यांनी या घटनेचा व्हिडीओ शुट केला. ही बाब संबंधित पोलिस अधिका-यांच्या लक्षात येताच त्यांनी आपल्या कर्मचा-यांना शिवराजला मारण्याचे आदेश दिले. त्यामुळे पोलिस अधिकारी व कर्मचा-यांनी शिवराजला अमानुषपणे मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओसुद्धा समाज माध्यमावर व्हायरल झालेला आहे. अमानुषपणे मारहाण करणा-या पोलिस अधिकारी-कर्मचा-यांवर कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा भाजयुमोतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल. यापुढे युवकांना अशी विनाकारण होणारी अमानुष मारहाण भाजयुमो कदापि सहन करणार नाही. असेही निवेदनात म्हटले आहे.
निवेदन सादर करताना इम्रान खान, मोनू पारधे, श्रीपाद भाकरे, विशाल ठेंगणे, नाना हजारे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.