Click Here...👇👇👇

जिल्हावासियांचे दु:ख बघून भद्रावतीच्या सुपुत्राने केले दुबईवरुन दान.

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- संपूर्ण जगात कोरोनाची लाट असताना चंद्रपूर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात आढळून आलेल्या कोरोना रुग्णांसाठी एक मदतीचा हात म्हणून दुबईस्थित भद्रावतीच्या सुपुत्राने अडीच लाखाचे दान दिल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


जोएल दिलीप देवधरे असे त्या दुबईस्थित दानी सुपुत्राचे नाव आहे. ते मूळचे भद्रावतीचे आहेत. त्यांचे वडील दिलीप देवधरे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. ते मागील तीन वर्षांपासून दुबई येथे आय. टी. अभियंता म्हणून कार्यरत आहेत. संपूर्ण जगभरात चाललेल्या महामारीच्या संकटात आपल्या मूळ जिल्ह्याची परिस्थिती पाहुन जोएल यांच्या मनाला वेदना होत होत्या. त्यामुळे आपण कोरोना रुग्णांसाठी काहीतरी मदतीचा हात दिला पाहिजे हा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. त्यांनी चंद्रपूर येथील रामनगर येथे कोविड रुग्णालयात नोडल अधिकारी असलेले त्यांचे डाॅक्टर मामा बंडू रामटेके यांना हा विचार दाखवला. त्यांनी त्यांना सहमती दर्शविली. 
त्यामुळे देवधरे यांनी या कोविड रुग्णालयाला अडीच लाखांची देणगी दिली. या रकमेतून अत्यंत निकडीच्या वेळी व्हेंटीलेटरला लागणारे साहित्य, आॅक्सिजन देण्यासाठी आवश्यक मास्क, अतिदक्षता विभागात लागणारे अत्यावश्यक साहित्य, महत्त्वाचे औषधोपचार इत्यादींवर खर्च करण्यात आला. मात्र हे दान देताना देवधरे यांनी कोणताही गाजावाजा किंवा प्रसिद्धी केली नाही. नव्हे, दान देताना कोणताही गाजावाजा होणार नाही ही त्यांची अट होती.
   देवधरे यांचे जिल्ह्याप्रती असलेले प्रेम, आपुलकी, जाणिव, भावना आणि आपण समाजाला काही देणे लागतो ही वृत्ती यामुळे कौतुकाचे चार शब्द पुढे आलेत. वडील दिलीप देवधरे आणि आई शोभा देवधरे यांच्या संस्कारातून जोएल यांची परोपकारी घडण झाली. परिसराशी नाळ जुळली. म्हणूनच दुबईस्थित असुनही जोएलने आपल्या जिल्हयाकरीता दिलेले दान फार महत्वाचे ठरले आहे.