चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात कामगाराचा मृत्यू.

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात कामावर असताना प्रदीप धानोरकर या प्रगत कुशल प्रशिक्षणार्र्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता. २८) घडली. यानंतर इंटकच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घटनास्थळ गाठून कामगाराच्या कुटुंबीयांना लाभ देण्याची मागणी केली. त्यानुसार वीज केंद्राच्या व्यवस्थापनाने तत्काळ २५ हजार रुपयांची आर्थिक मदत करीत अन्य लाभ मिळवून देण्याचे लेखी आश्वासन दिले.
वीज केंद्रात प्रदीप धानोरकर हे कामगार म्हणून काम करीत होते. शुक्रवारी कामावर असताना अचानक धानोरकर यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे वीज केंद्र परिसरात चांगलीच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच युथ इंटकचे जिल्हाध्यक्ष प्रशांत.भारती, इंटकचे ट्रान्स्पोर्ट युनियनचे जिल्हाध्यक्ष इरङ्कान शेख, अशरख खान, अब्दुल वहाब काझी, अलोक चौरे, आदिल खान व अन्य पदाधिकाऱ्यांनी वीज केंद्रात धाव घेतली.
यावेळी मृताच्या कुटुंबीयांना लाभ देण्याची मागणी इंटकच्या पदाधिकाऱ्यांनी केली. त्यानंतर मृताच्या कुटुंबीयांना तत्काळ २५ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. तसेच मृताच्या कुटुंबातील एका सदस्याला प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी म्हणून सामावून घेतले जाईल, मृताची पत्नी किंवा अन्य एका सदस्याला कंत्राटी म्हणून काम दिले जाईल, नियमानुसार दोन लाख रुपयांच्या विम्याचा लाभ मिळवून दिला जाईल, असे लेखी आश्वासन देण्यात आले.