गर्दी टाळण्यासाठी परवाना मिळालेली दारू दुकाने एकाच वेळी सुरू होणार?



(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- राज्य सरकारने चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाने जुनी दारू दुकाने व बार रेस्टाॅरंटचा परवाना नूतनीकरण आणि इच्छुक व्यावसायिकांकडून अर्ज मागविण्याचे वेळापत्रक जाहीर केले. अर्ज सादर करणे व स्वीकारण्यासाठी अडचणी येऊ नयेत, यासाठी चंद्रपूर, वरोरा व राजुरा येथे उत्पादन शुल्क विभागाने विशेष कक्ष तयार केले. मंगळवारी दि. २२ जून २०२१ पर्यंत या विभागाकडे दारू विक्री परवाना मिळविण्यासाठी १८० अर्ज प्राप्त झाल्याचे समजते. यातील सुमारे ८० अर्जदारांच्या प्रस्तावित दारू विक्री दुकानांच्या जागेची पाहणी उत्पादन विभागाच्या पथकाने केली. अर्जात नमूद केल्यानुसार दारू दुकानाची जागा आणि अन्य बाबींची पडताळणीही करण्यात आली.
परिपूर्ण ३० अर्जांवर जिल्हाधिकाऱ्यांची स्वाक्षरी शिल्लक!

दारू विक्री परवाना मिळविण्यासाठी अनेकांनी अर्ज सादर केले. मात्र बऱ्याच अर्जांमध्ये त्रुटी आढळल्याने काही रद्द झाले तर, काही अर्जदारांना कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या सूचना देण्यात आल्या. उत्पादन शुल्क विभागाला आतापर्यंत प्राप्त झालेल्या अर्जांमध्ये सुमारे ३० अर्ज परिपूर्ण आढळले. त्यामुळे अंतिम निर्णय घेण्यासाठी या अर्जांची फाईल जिल्हा समितीकडे सादर केली. या अर्जांवर जिल्हाधिकारी यांची स्वाक्षरी शिल्लक असल्याची माहिती आहे.
प्रत्येक तालुक्यात किमान २५ परवाने...

उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हा समितीकडे पाठविलेल्या अर्जांवर अंतिम शिक्कामोर्तब करण्याची सध्यातरी घाई नसल्याचे समजते. त्यामुळे सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे परिपूर्ण अर्ज या विभागाकडून मिळावे, असा या समितीचा कल आहे. त्यातून प्रत्येक तालुक्यात किमान २५ दारू विक्री परवाने मंजूर करून संभाव्य गर्दीला आळा घालता येऊ शकेल, असाही जिल्हा प्रशासनाचा अंदाज आहे.
दारूबंदीनंतर परवान्यांची स्थिती..

२०१५ मध्ये दारूबंदी लागू झाल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात ५४० दारू विक्री परवाने होते. त्यामध्ये देशी ११०, वाईन शॉप २४ आणि ३५० बार रेस्टाॅरंटचा समावेश होता. दारूबंदीनंतर जिल्ह्यातून १८ वाईन शॉप जिल्ह्यात स्थानांतर झाले, तर सहा शिल्लक होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने