Top News

शेतात काम करणाऱ्या महिलेवर अस्वलाचा हल्ला.



(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चिमूर:- चिमूर तालुक्यातील शेवटच्या टोकावरील वाघेला शेतशिवारात काम करणार्‍या महिलेवर अस्वलाने अचानक हल्ला करून तिला गंभीर जखमी केले. ही घटना सोमवारी (दि. १४) दूपारच्या सुमारास घडली. तुळसाबाई शामराव चौधरी (वय ४५) असे जखमी महिलेचे नाव आहे. या प्रकाराने शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे.
चिमूर तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या वाघेडा येथील तुळसाबाई शामराव चौधरी ही महिला आज दुपारी ४ वाजताच्या दरम्यान आपल्या शेतात काम करीत होती. अचानकपणे अस्वलाने महिलेवर हल्ला केला. लगतच्या शेतशिवारातील शेतकऱ्यांना या घटनेची कल्पना आल्याने त्यांनी आरडाओरड करत घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अस्वल पळून गेले.
अस्वलाच्या हल्ल्यातून महिलेला वाचवले जरी असले तरी ती गंभीर जखमी झाली आहे. महिलेच्या तोंडावर अस्वलाने ओरबडले. त्यामुळे तिचा चेहरा रक्तबंबाळ झाला होता. जखमी अवस्थेत त्या महिलेला चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार करून त्या महिलेला पुढील उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले. या घटनेमुळे वाघेडा व लगतच्या शेतक-यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने