Top News

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांकरीता चंद्रपुरात रुग्णालय.

दौलत बेले यांची पत्रपरिषदेत माहिती.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील केंद्रिय सेवानिवृत्त आणि कार्यरत कर्मचा-यांना मोफत औषध उपचार मिळावा याकरीता केंद्रिय आरोग्य मंत्रालयाने चंद्रपूर येथे रुग्णालय मंजुर केले असून ते लवकरच सुरु होणार असल्याची माहिती चांदा आयुध निर्माणीतील सेवानिवृत्त कर्मचारी तथा सोशल फोरम फाॅर  सेंट्रल गव्हर्नमेंट पेंशनर्स चे संस्थापक दौलत बेले यांनी पत्रपरिषदेत दिली.
      पत्रपरिषदेत दौलत बेले यांनी सांगितले की,चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील केंद्रिय सेवानिवृत्त कर्मचा-यांना औषधोपचाराकरीता नागपूरला जावे लागते. सेवानिवृत्त कर्मचा-यांचे वाढते वय आणि चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील गावांपासून नागपूरचे दूर असलेले अंतर लक्षात घेता चंद्रपूर येथे केंद्रिय सेवानिवृत्त कर्मचा-यांकरीता रुग्णालय सुरु करण्यात यावे, अशी मागणी आपण प्रथम सन २००६ मध्ये केली होती. तसेच सन २०१२ मध्ये यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात  पब्लिक इंटरेस्ट लिटीगेशन ११७/२०१२ दाखल केली होती.केंद्रिय आरोग्य मंत्रालयाकडे  सतत पत्रव्यवहार करुन पाठपुरावा केला. अखेर विद्यमान केंद्रिय आरोग्यमंत्री डाॅ.हर्षवर्धन यांनी १५०३५/४९/२०१९ सी.जी.एच.एस.दि.११ फेब्रुवारी २०२१ नुसार चंद्रपूरसह इतर १६ ठिकाणी रुग्णालय सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. या रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका आणि लिपिक असा कर्मचारी वर्ग राहणार आहे. 
 असेही बेले यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
      मागणी पूर्ण केल्याबद्दल केंद्रीय आरोग्यमंत्री डाॅ.हर्षवर्धन,माजी केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, आ.सुधीर मुनगंटीवार यांचे बेले यांनी यावेळी आभार मानले.तसेच माजी केंद्रिय अर्थराज्यमंत्री स्व. शांताराम पोटदुखे यांनीही सहकार्य केल्याचे सांगितले.रुग्णालयाकरीता शासनाने त्वरीत जागा उपलब्ध करुन द्यावी अशीही मागणी बेले यांनी पत्रपरिषदेत केली. या मागणीकरीता सुहास साकळे, अनिल खमांकर, रंगाचारी, प्रमोद गौरशेट्टीवार, विनायक नामोजवार, पंढरी पिंपळकर, अण्णा कुटेमाटे, मनोहर साळवे, पुरुषोत्तम मत्ते, वामन नामपल्लीवार, मोहन मार्गनवार, शेखर घुमे, मधू अतकरे, लिलाधर चौधरी, प्रताप सुर्वे आणि तीनशे सक्रीय सभासद कार्यकर्त्यांनी प्रयत्न केल्याचे सांगत या रुग्णालयाची सुविधा चंद्रपूर जिल्ह्यतील २५ हजार केंद्रिय सेवानिवृत्त व कार्यरत कर्मचा-यांना उपलब्ध होणार असल्याचेही बेले यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
      पत्रपरिषदेला मनोहर साळवे, सुहास साकळे, वामन नामपल्लीवार, मोहन मार्गनवार, प्रमोद गौरशेट्टीवार, शेखर घुमे, पुरुषोत्तम मत्ते, अण्णा कुटेमाटे, पंढरी पिंपळकर, माणिक लाखे,विनायक नामोजवार, प्रताप सुर्वे, लिलाधर चौधरी, सुनील नामोजवार उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने