Top News

अंगावर विज पडून दोघांचा जागीच मृत्यू.

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
यवतमाळ:- जिल्ह्यात सलग दुसऱ्‍या दिवशीही अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. बुधवारी (ता. ९) कळंब व पुसद तालुक्यात विजांच्या कडकडाटांसह आलेल्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले. कळंब तालुक्यात एक तरुण; तर पुसद तालुक्यात मुलगी असे दोघे जण वीज पडून ठार झाले.
कळंब तालुक्यातील शरद या गावातील सुखदेव पारणू कोरझडे (वय २७) या तरुणाचा मंगळवारी वीज पडून मृत्यू झाला. त्याचा सहकारी कमलाकर मेश्राम हा गंभीर जखमी झाला. नमीना यास्मिन मोहम्मद (रा. यवतमाळ) यांच्या शरद गावातील शेतात कमलाकर श्रीराम मेश्राम (वय ६०) व सुखदेव कोरझडे हे ट्रॅक्टरने पेरणीपूर्व नांगरणी करीत होते. सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या मुसळधार पावसात वीज पडून सुखदेव कोरझडे जागीच ठार झाला; तर कमलाकर मेश्राम गंभीर जखमी झाला.
घटनेची माहिती पोलिस पाटील प्रकाश डोंगरे यांना कळताच त्यांनी नांझा बीटचे जमादार सुरेश झोटिंग व पोलिस नायक विजय लोखंडे यांना कळविले. झोटिंग व नायक यांनी त्वरित घटनास्थळ गाठून जखमीला यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात पोहोचवण्याची व्यवस्था केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय कळंब येथे आणला. मृत सुखदेव हा अविवाहित असून त्याच्यामागे म्हातारी आई व एक बहीण आहे.
पुसद तालुक्यातील जमशेदपूर येथे दुपारी दीड वाजता शेतात काम करताना अंगावर वीज पडल्याने समीक्षा पिंटू जाधव (वय १४) ही मुलगी मृत्युमुखी पडली. तहसीलदार अशोक गीते यांनी घटनास्थळाला भेट दिली. जमशेदपूर शिवारात विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस झाला. समीक्षा जाधव ही बायजाबाई सूर्यभान राठोड यांच्या शेतात काम करीत होती. तिच्या मृत्यूमुळे जमशेदपूरमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने