Top News

ज्या सरणावर उठून बसले, तिथेच करावा लागला अंत्यसंस्कार.

हृदय पिळवटून टाकणारी घटना.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
वरोरा:- चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा याठिकाणी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. येथील एक वृद्ध घरात निपचित पडून राहिल्याने नातेवाईकांनी मृत समजून त्यांना अंत्यसंस्कारासाठी नेलं. पण याठिकाणी अंत्यसंस्काराची पूर्ण तयारी झाल्यानंतर केवळ मुखाग्नी देणं बाकी असताना संबंधित वृद्ध अचानक उठून बसले. यामुळे उपस्थित नातेवाईकांना थोड्या वेळासाठी धक्का बसला. पण त्यानंतर नातेवाईकांचा आनंद गगनात मावेना. नातेवाईकांनी त्वरित वृद्धाला रुग्णालयात दाखल केलं.
पण दुर्दैवाची बाब म्हणजे रुग्णालयात दाखल केल्यानंतर अवघ्या दोन तासांतच त्यांची प्राणज्योत मालवली आहे. त्यामुळे ज्या सरणावर ते उठून बसले होते. त्याच सरणावरच त्यांना मुखाग्नी द्यावा लागला आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. खरंतर ते पून्हा जिवंतचं असतील अशी भाबडी आशा अनेकांना वाटली. पण यावेळी मात्र त्यांचा खराखुरा मृत्यू झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील रहिवासी असणारे एक वयोवृद्ध मागील काही काळापासून त्यांची प्रकृती थोडीशी खालावली होती. त्यामुळे ते बेडवरच पडून होते. दरम्यान रविवारी सकाळी ते खाटावर निपचित पडून राहिल्याने कुटुंबीयांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं समजून कुटुंबीयांनी त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी केली. स्मशानभूमीत गेल्यानंतर सरणावर देहही ठेवण्यात आला.
अग्नी देण्यासाठी कुटुंबातील सदस्य जाणार तेवढ्यात संबंधित वयोवृद्ध सरणावर उठून बसले. मृत व्यक्ती अचानक जिवंत झाल्याचं पाहून अनेकांचा थरकाप उडाला, बरेचजण सैरावैरा पळत सुटले. पण संबंधित व्यक्तीनेच त्यांना परत जवळ बोलावलं. यानंतर आनंदीत झालेल्या नातेवाईकांनी त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल केलं. पण रुग्णालयात दोन तांसानी त्यांचा खराखुरा मृत्यू झाला. पण नातेवाईकांना विश्वास बसेना. त्यामुळे दोन वेगवेगळ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करावी लागली. पण दोन्ही अधिकाऱ्यांनी वृद्धाचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली. यामुळे ज्या सरणावर ते वयोवृद्ध उठून बसले होते. त्याच सरणावर पुन्हा त्यांना मुखाग्नी द्यावा लागला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने