चंद्रपूर:- राज्य सरकारने चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी उठविल्यानंतर प्रत्यक्षात दारूविक्री कधी सुरू होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले असताना दारूविक्रेते आणि दारू पिणाऱ्यांसाठी आता प्रशासकीय पातळीवरून 'गुड न्यूज' आली आहे. दोन दिवसात जवळपास ८० अनुज्ञप्तींना मंजुरी दिली जाणार असून, जुलैच्या पहिल्या आठवड्यात प्रत्यक्ष दारूविक्री सुरू होणार आहे.
एकूण ५६१ अबकारी अनुज्ञप्तींना एप्रिल २०१५ पूर्वी परवानगी होती. दारूबंदीच्या निर्णयानंतर हे सर्व परवाने संपुष्टात आले. आता दारूबंदी उठल्याने नव्याने या सर्व दुकानदारांना परवान्याचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. २५ जूनपर्यंत २१६ अनुज्ञप्तीधारकांनी नूतनीकरणासाठी अर्ज केले आहे. त्यापैकी १२४ अर्जाची पडताळणी करण्यात आली. काही ठिकाणी मोकाचौकशीसुद्धा करण्यात आली. मोकाचौकशी करताना काही बाबी उघडकीस आल्या.
अनेक दारू दुकानांच्या जागा भाड्याने घेतलेल्या आहेत. दारू दुकानदार भाडे देत नाहीत, अशी अनेकांची तक्रार आहे. काही दुकानदारांनी आता परवाने संपुष्टात आल्यानंतर जागा विकल्या. महिलांना त्रास होईल अशा ठिकाणी दारू दुकाने सुरू करण्यात येऊ नये, अशाही तक्रारी आहेत. जुनी दुकाने ज्या जागेवर सुरू होती त्याच ठिकाणी नव्याने सुरुवात केली जाणार असेल तर फार अडचण नाही पण, दुकाने स्थलांतरीत असतील तर शासनाच्या नियमानुसार परवानगी दिली जाणार आहे.
एकखिडकी योजनेद्वारा तीन ठिकाणाहून अर्ज घेण्यात आले. मोकाचौकशी आणि पडताळणी केलेल्या अर्जाना मान्यता देण्यात यावी, यासाठी उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे परवानगीसाठी फाईल पाठविली. त्याला जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी सोमवारी मान्यता दिली. मंगळवार आणि बुधवारी या दोन दिवसात जवळपास ८० परवाने मंजूर केले जाणार आहे. मंजुरीनंतर ही दुकाने कधीही सुरू करता येतील. त्यामुळे प्रत्यक्षात दारूविक्रीचा मुहूर्त जुलैच्या पहिल्या आठवड्यात असल्याचे आता स्पष्ट दिसू लागले आहे.
#chandrapur #Adharnewsnetwork #drinks