(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- लहान मुलांचा वाढदिवस म्हटलं कि पाहुण्यांची लगभग, गिफ्ट ची आतुरता, केक आणि खाण्याची रेलचेल असे काहीसे दिसणारे चित्र. परंतु राजुरा येथील रुद्र राहुल अवदुत या चिमुकल्याने आपला वाढदिवस विध्यार्थीना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करून साजरा केला. कुठलाही अवाजवी उडाऊ खर्च न करता सामाजिक दायित्वतून त्याने आपला वाढदिवस साजरा करून एक आदर्श निर्माण केला.
सन्मित्र महिला नागरी सहकारी बँक मर्यादीत शाखा राजुरा येथे शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेले राहुल अवदुत यांच्या मुलाचा वाढदिवस होता. रुद्र ला अगदी लहान पणापासूनच पशु -पक्षी आणि सामाजिक कार्याविषयी खूप कुतूहल आहे. घरी सुद्धा कुठल्या ना कुठल्या समाजकार्यविषयी चाललेली चर्चा आणि कार्य ऐकून व बघून त्याला यात आवड निर्माण झाली. त्यामुळे वाढदिवसाला मोफत पुस्तकं देऊन वाढदिवस साजरा केला. आदर्श हायस्कुल येथील इयत्ता नववी च्या विध्यार्थीना पुस्तके वाटप करण्यात आले.
यावेळी आदर्श हायस्कुल चे मुख्याध्यापक सारीपुत्र जाभूळकर, आदर्श प्राथमिक च्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, राधा राहुल अवदुत व रुद्र अवदुत यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बादल बेले यांनी केले तर आभार प्रदर्शन भाग्यश्री क्षीरसागर यांनी मानले. #Birthday