Top News

बहुप्रतीक्षेनंतर आजपासून जिल्ह्यात अधिकृत दारू सुरू होणार. #chandrapur #drink


चंद्रपूर:- राज्य शासनाने जिल्ह्यातील दारूबंदी उठविल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाने परवाने देणे सुरू केले. जिल्ह्यात ९८ दारू परवाने मिळाले असून सोमवारी आणखी ५० जणांना परवानगी मिळणार आहे. ज्यांना परवानगी मिळाली आहे, ते दारू विकण्यास मोकळे झाले आहे. मात्र त्यांच्याकडे दारूचा स्टाॅक नाही. #chandrapur #drink 
शनिवार, रविवारी टाळेबंदी असल्याने परवानाधारक परवानगी मिळूनही दारूची आयात करू शकले नाही. मात्र सोमवारी दुपारपर्यंत जिल्ह्यात अधिकृत दारू येण्याची शक्यता आहे. त्यानंतरच दारूची दुकानातून विक्री सुरू होणार आहे. बहुप्रतीक्षेनंतर जिल्ह्यात अधिकृत दारू सुरू होणार आहे.
यासाठी उत्पादन शुल्क विभागाने एक खिडकी सुरू केली असून त्या माध्यमातून दारू दुकानांना परवाने मंजूर केले जात आहे. विशेष म्हणजे, परवाना अर्जातील त्रुटी दुुरुस्त करून जिल्ह्यात ९८ दारू परवाने मंजूर करण्यात आले असून संबंधितांच्या हातात परवाने पोहचले आहे. मात्र कोरोना निर्बंधामुळे शनिवार तसेच रविवार कडक बंद पाळला जात आहे. परवाने मिळूनही दारूच्या अधिकृत डीलर्सकडे मागणी नोंदविताच आली नाही. परिणामी सोमवारी नोंदणी करून अधिकृत दारू जिल्ह्यात पोहचणार आहे. मात्र यासाठी किमान दुपारपर्यंत तरी वाट बघावी लागणार आहे.
विशेष म्हणजे, कोरोना प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने निर्बंध घातले आहे. त्यानुसार दुपारी ४ वाजेपर्यंत दुकाने सुरू राहणार आहे. काही परवानाधारकांनी नागपूर गाठले असून कोणत्याही परिस्थितीत दारू आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे.
शुक्रवारी सर्व अटींची पूर्तता केल्यावर जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी 98 दारूविक्री परवान्यांना अधिकृत परवानगी देत शनिवारी 98 परवाने दारूविक्रेत्यांना जारी केले, सोमवार 5 जुलै ला पुन्हा 50 परवाने जारी करण्यात येणार आहे.
जारी करण्यात आलेल्या दारू विक्री परवान्यात......

सध्या जिल्ह्यात जारी करण्यात आलेल्या दारू विक्री परवान्यात 64 परमिट रूम, 1 वाइन शॉप, 26 देशी दारू दुकाने, 6 बियर शॉपी व 1 क्लबचा समावेश आहे. 50 दारूविक्री परवाने जारी केल्यावर जिल्ह्यात 148 दारू दुकाने सुरू होणार आहे, उर्वरित परवाने पुढच्या आठवड्यात जारी होऊ शकतात.

होलसेल विक्रेता नाही....

जिल्ह्यामध्ये दारू विक्रीसाठी होलसेल विक्रेता नाही. त्यामुळे नागपूर किंवा इतर जिल्ह्यांवर येथील व्यावसायिकांना अवलंबून रहावे लागते. त्यामुळे परवानगी मिळूनही नागपूर येथून दारू आणण्यासाठी किमान चार ते पाच तास वेळ लागू शकतो. परिणामी सोमवारी दुपारपासून अधिकृत दारू विक्री सुरू होईल, असा अंदाज आहे.
मद्यपींमध्ये आनंद....

जिल्ह्यात अधिकृत दारू दुकाने सुरू होत असल्याने मद्यपींमध्ये आनंद आहे. केव्हा एकदा वैध दारू विक्री सुरू होते आणि केव्हा प्यायला मिळते, असे मद्यपींचे झाले आहे.
नोकरांसाठी धावपळ....

जिल्ह्यात ९८ दारू दुकानांना परवानगी मिळाली आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी व्यवस्था अपडेट करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी नोकरांची मागणी वाढली आहे. मात्र जे जास्त पगार देणार त्यांच्याकडे नोकरवर्ग जात असल्यामुळे व्यावसायिकांची धावपळ सुरू झाली आहे.
सैराट होऊ नका.....

जिल्ह्यात अधिकृत दारू सुरू होत आहे. त्यामुळे अनेकांनी आनंद व्यक्त केला असला तरी दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे दारू सुरू झाली म्हणून सैराट होणे चुकीचे असून आपल्यामुळे समाज तसेच कुटुंबातील व्यक्तींना त्रास होऊ नये, असे वागणे योग्य ठरेल.
रंगरंगोटी अंतिम टप्प्यात.....

परवानगी मिळताच दारू दुकानांची रंगरंगोटी तसेच स्वच्छता आता अंतिम टप्प्यात आली आहे. शहरातील बार तसेच दारू दुकाने आता सजली आहे. विशेष म्हणजे, शहराबाहेरील ज्या बारच्या इमारती मागील सहा वर्षांपासून धूळ खात पडल्या होत्या. त्या इमारतीही आता चकाकू लागल्या आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने