दारु दुकाने बंद होताच गोंडपिपरीत अवैध दारू विक्रीला सुरुवात. #Drink(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गोंडपिपरी:- कोरोनाच्या नियमांमुळे दारू दुकानांना सकाळी ७ ते ४ वाजताची मर्यादा आहे. या संधीचा फायदा काही अवैध दारूविक्रेते घेत आहे. दुपारी ४ वाजतानंतर अवैध दारू विक्री जोरात सुरू असल्याची चर्चा आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठताच मद्यपींमध्ये आनंदाची लाट पसरली. अशातच जुन्या परवानाधारकांनी आपले परवाने नूतनीकरणासाठी जीवाचे रान केले. अखेर यात त्यांना यश आले. जिल्ह्यात सर्वत्र अधिकृत दारूविक्री दुकाने सुरू झाली. परमिट रूम असलेले बियर बार आणि बियर शॉपी सुद्धा सुरू झाल्या. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे वेळेचे निर्बंध लावण्यात आल्याने दारू दुकानांची उघडण्याची वेळ सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत अशी करण्यात आली.
उपरोक्त वेळात प्रत्येक दारू दुकानात, बियर बार, बियर शॉपीमध्ये प्रचंड प्रमाणात गर्दी असते. मात्र ४ वाजताच्या नंतर संपूर्ण दारू दुकाने बंद होताच मद्याचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्या मद्यपींचा चांगलाच हिरमोड होत आहे. दारू दुकाने बंद झाल्यानंतर काही मद्यपींना मद्याचा आस्वाद घेण्याकरिता धडपड करावी लागत आहे. महागड्या किमतीने मद्य विकत घ्यावे लागत असल्याचे चित्र आहे.
दुकाने बंद होण्यापूर्वीच शहरातील व इतर ठिकाणातील जुने अवैध दारू विक्रेते या संधीचा फायदा घेत आहे. दुकाने बंद होण्यापूर्वीच दारूची साठवणूक करून ज्यादा दराने ती विक्री करीत आहे. यामुळे पुन्हा एकदा अवैध दारू विक्रीने डोके वर काढल्याचे चित्र आहे. दारूबंदी काळात प्रचंड उलाढाल करणाऱ्या अवैध दारू विक्रेत्यांनी आपल्या रोजीरोटी करिता हा नवा फंडा अमलात आणल्याचे बोलले जात आहे. यामुळे दारूबंदी काळात अवैध दारू विक्री, चालू काळातही अवैध दारू विक्री सुरू असल्याने बंदी व चालू यात फरकच काय? असे काही सूज्ञ नागरिकांचे मत आहे. यापेक्षा दारू दुकानांची वेळ नियमित करून मद्यपींना दिलासा द्यावा, असेही बोलले जात आहे. #Drink

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत