चंद्रपूर जिल्ह्यात वीज पडून तीन जण ठार. #Lightningstrikes

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- जिल्ह्यात बुधवारी दुपारच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. चंद्रपूर तालुक्यातील सोनेगावच्या शेतात काम करीत असलेल्या गोवर्धन किशन गोहणे (वय ३५) या शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला; तर कोरपना तालुक्यात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये भीमराव मारू मडावी (वय ४०) आणि कवडू मोहुर्ले (वय ३६) यांचा समावेश आहे.
बुधवारी दुपारच्या सुमारास सोनेगाव येथील गोवर्धन गोहणे हे शेतात काम करण्यासाठी गेले होते. यावेळी वीज कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी सोनेगाव गाठत मृत गोवर्धन यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. कुटुंबाला आर्थिक मदत करत शासकीय मिळणारी मदतही तत्काळ मिळावी यासाठीकरिता प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिवती तालुक्यातील सीतागुडा येथील भीमराव मडावी हा पोट भरण्यासाठी कोरपना तालुक्यातील एकोडी येथील रवींद्र गोखरे यांच्याकडे सालगडी म्हणून काम करीत होता. बुधवारी शेतात कपाशीच्या पिकाला पत्नी सोबत खताची पेरणी करीत असताना पाऊस सुरू झाला. खत पावसात भिजणार म्हणून दुसरीकडे ठेवून तिफणीला जुंपले बैल सोडण्यासाठी जात असताना नियतीने डाव साधला. भीमराव यांच्या अंगावर वीज कोसळली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी सुखरूप बचावली.
दुसऱ्या एका घटनेत सोनुर्ली येथील पंढरी पडवेकर यांच्या शेतावर कवडू मोहुर्ले हा शेतमजूर म्हणून काम करीत होता. तो बुधवारी शेतावर कामासाठी आला. सायंकाळी साडेचार वाजता पावसाचा रंग दिसत असल्याचे पाहून तो बैलबंडीने घराकडे जाण्यास निघाला. शेताबाहेर पडताच अचानक वीज पडली. त्यात एका बैलासह कवडू मोहुर्ले याचा मृत्यू झाला. बैलबंडीवर बसलेले अन्य दोघे जण बचावले.

#Lightningstrikes #chandrapur #korpana