जाहिरात... Advertisement... विज्ञापन

अपघाताचा बनाव करून पतीने केली पत्नीची हत्या. # murder


पोलिसांनी केली तीन जणांना अटक.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
बल्लारपूर:- पत्नीसोबत संसार सुरू असताना प्रेयसीला एक वर्षापासून सोबत ठेवल्याने नेहमी खटके उडत होते. रोजच्या भांडणाला कंटाळून पतीने पत्नीचा काटा काढण्याचा मित्रांसोबत कट रचला. ३० जूनच्या रात्री १० वाजता पत्नीचा खून केला व अपघात झाल्याचा देखावा करून कोठारी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या घटनेत पोलिसांनी आधी मर्ग दाखल केला. नंतर तपासाची चक्रे वेगाने फिरवून मृतक कविता गंगाधर कन्नाके हिचा पती गंगाधर सीताराम कनाके (२८), त्यांचे मित्र राजकुमार बाबूराव कन्नाके (२२) व शंकर रामालू गंधमवार (२०) या तिघांना खुनाच्या गुन्ह्यात अटक केली. या घटनेमुळे चंद्रपूर जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. #murder #chandrapur #ballarpur
बल्लारपूर तालुक्यातील उमरी फाटा ते कवडजई रस्त्यावरील पुलाजवळ ३० जून रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास आरोपी गंगाधर कन्नाके व त्याची गर्भवती पत्नी कविता चिमूर येथून कोठारीकडे येत असताना रानडुकराने दुचाकीस घडक दिल्याने अपघात झाला. त्यामध्ये पत्नी मरण पावल्याची तक्रार कोठारी पोलीस ठाण्यात आरोपी गंगाधरने दाखल केली होती. तक्रारीवरून पोलिसांनी मर्ग दाखल केला. हा अपघात नसून घातपात असल्याची शंका पोलिसांना आली असतानाच मृतक महिलेच्या नातेवाइकांनी संशय व्यक्त केला होता. दरम्यान, पोलिसांनी तपासचक्रे वेगाने फिरवून प्राथमिक माहिती काढली असता आरोपी गंगाधर कन्नाके याचे एका महिलेशी सूत जुळले होते. तिच्यासोबत एक वर्षापासून घरात पत्नीसोबत राहत असल्याने सतत वाद होत होते.
या सततच्या भांडणाला कंटाळून पत्नीचा काटा काढण्याचा गंगाधरने कट रचला. त्यासाठी त्याने त्यांचे मित्र शंकर गंधमवार व राजकुमार कन्नाके या दोघांना पैसे देण्याचे कबूल केले होते. तिघांमध्ये रचलेल्या कटानुसार ३० जूनच्या रात्री अपघाताचा बनाव करून पत्नी कविताची हत्या केली. मृतक कविताला दोन वर्षाची मुलगी असून, ती सध्या गर्भवती होती. आरोपी पतीची प्रेयसी त्याच्याच घरात राहत असून, तीसुद्धा गर्भवती आहे, हे विशेष.
    या प्रकरणी चौकशीअंती भादंवि कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास ठाणेदार खुशाल चव्हाण करीत असून, साहाय्यक ठाणेदार धीरज राजूरकर, इटनकर, बालाजी कवलकर, साई उपरे, श्रीनिवास जाधव, टेंभुणे, सचिन पोहणकर, हरीश देवाळकर व मनीता जयस्वाल सहकार्य करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत