'या' शहरात एकाच रात्री चार ठिकाणी चोरट्यांनी केला हात साफ. #Theft(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- तालुक्यातील घुग्गुस शहरात एकाच रात्री चार ठिकाणी घरफोड्या करून हजारोंचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना आज शुक्रवारी उघडकीस आली आहे. या घटनेची तक्रार नागरिकांनी घुग्गुस पोलिसांत दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलीस तपास करत असल्याची माहिती आहे.
घुग्गुस शहरात सध्या चोरी तसेच घरफोड्यांच्या गुन्ह्यात वाढ होत आहे. अशातच घुग्घुस येथील रामनगर वार्ड क्रमांक ५ वेकोली वसाहतीत गुरुवारच्या रात्री चंद्रशेखर चौधरी, शोभा भोयर, प्रोमिल मंडल, जंगा ओडलु यांच्या घरात घुसून चोरी केली. तसेच रोख रकमेसह चौदा हजारांचा मुद्देमाल लंपास केला.
आज शुक्रवारी सकाळी चोरीची ही बाब लक्षात येताच नागरिकांनी याची माहिती घुग्गुस पोलिसांना दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. घुग्गुस शहरात चोरी तसेच घरफोड्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून पोलिसांनी रात्रीच्या वेळेस परिसरात गस्त घालावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस परिसरात तपास यंत्रणा वाढणार असून सीसीटीव्हीदेखील तपासण्यात येणार असल्याची माहिती आहे. गावात चोरट्यांची टोळी सक्रिय आहे का? चोरलेला माल कुठे विकला जातो? याचाही पोलीस शोध घेत असल्याची माहिती आहे.#Theft

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत