Top News

अखेर..! "त्या" पाणी टाकी बांधकामाची होणार चौकशी. #Watertank


जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश, त्रिसदस्यीय चौकशी समिती गठीत.

विरोधी नगरसेवकांच्या तक्रारीची दखल.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोरपना तालुक्यातील सर्वात मोठे व औद्योगिक शहर गडचांदूर नगरपरिषदच्या सहाय्य निधीतून शहरातील मध्यभागी असलेल्या पाणीच्या नवीन टाकीचे बांधकाम करण्यात आले.मात्र सदर टाकीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे तरी त्याची योग्य ती चौकशी करून दोषींवर उचित कार्यवाही करावी अशी तक्रार काही दिवसांपूर्वी येथील विरोधी नगरसेवक अरविंद डोहे आणि रामसेवक मोरे यांनी जिल्हाधिकारी, नगरविकास मंत्री,जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका विभाग चंद्रपूर यांच्यकडे ३ जून रोजी निवेदनाद्वारे केली होती.याविषयी जिल्हाधिकारी यांच्या मागणीनुसार न.प.कडून १० जून रोजी सदर कामाची सध्यास्थितीचा अहवाल न.प.ने १० जून रोजी सादर केला होता.आता जिल्हाधिकारी यांनी प्रकरणानुषंगाने नियमानुसार योग्य चौकशी होण्यासाठी त्रिसदस्यीय चौकशी समिती गठीत करून   तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश १० जुलै रोजी पत्राद्वारे दिला आहे. #Watertank
      सदर कामाची कार्यान्वय यंत्रणा ही महाराष्ट्र जिवन प्राधिकरण विभागाला देणे गरजेचे होते.मात्र या कामात मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार करून पैसा कमविण्याच्या उद्देशाने सदरचे काम न.प.कडेच ठेवल्याचे आरोप करण्यात आले.तसेच याची देखरेख न.प.आरोग्य विभाग प्रमुख,मेकॅनिकल इंजिनीअर स्वप्निल पिदूरकर याच्याकडे देण्यात आली असे तक्रारीत नमूद आहे.आता ज्याला सिव्हिल कामांचा कुठलाही अनुभव नाही अशा मेकॅनिकल इंजिनीअरकडे जर सिव्हिलची कामे दिली तर ती कामे कशी होतात याचे प्रत्यक्ष अनुभव नवीन टाकीत पाणी भरून केलेल्या टेस्टिंगच्या वेळी कशाप्रकारे याच्या रिंगातून व स्लॅब मधून पाणी बदबद गळायला लागल्याचे दृश्य पाहून कामाचा दर्जा कसा असेल याची प्रचिती सर्वांना आलेलीच आहे.निव्वळ कामात भ्रष्टाचार करून पैसा कमविण्याच्या उद्देशाने पिदूरकरकडे सदर टाकीचे काम सोपविण्यात आले.तसेच याला सिव्हिल कामाची एमबी बनविण्याचे अधिकार नसतांनाही त्याने स्वतः वाढीव एमबी बनविली व त्यानुसारच संबंधित ठेकेदाराला आरए बिल दिले.असे आरोप करत याची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधितांवर कार्यवाही कारवाई करावी अशी मागणी नगरसेवक डोहे व मोरे यांनी निवेदनाद्वारे केली होती.
याविषयी जिल्हाधिकारी यांनी समितीचे पदसिद्ध अधिकारी राजूरा उपविभागीय अधिकारी एस.पी.खलाटे अध्यक्ष आणि गजानन भोयर मुख्याधिकारी न.प.वरोरा,अरविंद शेरकी कार्यकारी अभियंता महा.जिवन प्राधिकरण विभाग चंद्रपूर यांची सदस्य म्हणून नियुक्ती केली असून उपरोक्त चौकशी समितीने तक्रार अर्जाच्या अनुषंगाने मुद्देनिहाय सविस्तर चौकशी करावी व केलेल्या चौकशीचा अहवाल आपले स्वयंपष्ट अभीप्रायासह तात्काळ सादर  करावा असे आदेश दिले आहे. सदर प्रकरणी निष्पक्ष,निस्वार्थपणे चौकशी होणार अशी अपेक्षा तक्रारदारांनी व्यक्त केली असून चौकशी समितीच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने