लसीकरणाच्या नावाखाली मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला. #Kidnapping

Bhairav Diwase
0

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चिमूर:- एक दहाव्या वर्गातील मुलगी शाळेत जात असताना अचानक तिच्याजवळ टाटा सुमो थांबते. त्यातील दोन पुरुष व एक महिला खाली उतरते आणि थेट त्या मुलीला कोरोनाची लस द्यायची असल्याचे सांगून इंजेक्शन बाहेर काढते. #Kidnapping
मात्र ऐनवेळी मुलीला संशय आल्याने ती आपला हात झटकून तिथून पळ काढते. एखाद्या चित्रपटातील अपहरणाचा प्रसंग वाटावा, असा हा प्रकार गुरुवारी जांभूळघाट येथे घडला. या प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. #Adharnewsnetwork
कोरोनाची तिसरी लाट येणार अशी शक्यता असल्याने या लाटेला रोखण्यासाठी देशात फार मोठ्या प्रमाणात लसीकरण चालू आहे. मात्र यात लसीकरणाच्या आड बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन मुलींना पळवून नेणारी टोळी तर सक्रिय नसावी, असा संशय जांभूळघाट येथील या प्रकारावरून बळावला आहे.
गुरुवारी सकाळी ११.३० वाजताच्या दरम्यान जांभूळघाट येथील मधूबन विद्यालयात दहाव्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी शाळेत जात असताना एक पांढऱ्या रंगाची टाटा सुमो तिथे आली. त्यातील दोन पुरुष आणि एका महिलेने संबंधित मुलीला अडविले व तुला कोरोनाची लस द्यायची आहे, असे म्हणत थांबवले. त्यानंतर लस देण्याचाही प्रयत्न केला. परंतु हा प्रकार काहीतरी गैर असल्याचे संबंधित मुलीच्या लक्षात येताच तिने आपला हात झटकून तिथून पळ काढला. त्यानंतर घडलेला सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगितला. मुलीला काही गुंगीचे इंजेक्शन तर दिले नसावे म्हणून वडिलांनी जांभूळघाट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून डाॅक्टरांकडून तपासणी केली असता इंजेक्शन आत गेले नसल्याचे सांगितले. या घटनेची माहिती पूर्ण गावात पसरली. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टोळी तर सक्रिय नाही ना?

कुठल्याही अनोळखी व्यक्तीकडून इंजेक्शन घेणे मुलीला पटले नाही म्हणून तिने आपला हात जोरात झटकला. म्हणून मुलीला पळवून नेण्याचा मोठा अनर्थ टळला. या घटनेवरून चिमूर तालुक्यात कोरोना लसीकरणाच्या नावाखाली मुलींना बेशुद्ध करून पळवून नेणारी टोळी तर सक्रिय झाली नसावी ना, असा संशय आता नागरिकांना येऊ लागला आहे. या प्रकारामुळे जांभूळघाट व परिसरातील विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पोलिसांकडून कुटुंबीयांची विचारपूस.....

घटनेची माहिती भिसी पोलिसांना होताच त्यांनी जांभूळघाट येथे येऊन संबंधित मुलगी व तिची आई आणि आजोबा यांची भेट घेतली. त्यांना आपल्या वाहनात बसवून भिसी ठाण्यात नेले व सविस्तर विचारपूस केली. त्यानंतर पुढे काय झाले, हे कळू शकले नाही. मात्र पोलिसांनी हे प्रकरण गंभीरतेने घेतल्याचे कळते.

लसीकरणाचा हा कुठला प्रकार?

लॉकडाऊन असताना नियमांचे उल्लंघन करून बाहेर फिरणाऱ्यांना पोलीस व आरोग्य विभागाने रस्त्यात अडवून कोरोना चाचणी अनेकदा केली आहे. मात्र ही कोरोनाची चाचणी आहे. कोरोनाचे लसीकरण करताना मात्र अनेक बाबींची ऑनलाईन पूर्तता करावी लागते. त्याचे रेकाॅर्ड संगणकात तयार केले जाते. ही लस कुठेही, कशीही देता येत नाही. त्यामुळे जांभूळघाट येथे घडलेला हा प्रकार निश्चितच आरोग्य विभागाकडून झालेला नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)