Top News

भारीच की...... "या" गावातील प्रत्येक तरुण-तरुणी बसणार सरपंचाच्या खुर्चीत. #Sarpanch


ग्रामपंचायत सभेत ठराव; नायक चित्रपटातील कहाणी प्रत्यक्षात.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चिमूर:- तुम्हाला अनिल कपूरचा नायक चित्रपट आठवतोय का, त्यात तो एक दिवसाचा सीएम (मुख्यमंत्री) झाल्याचे तुम्ही पाहिलं असेल. ती झाली फिल्म, पण चंद्रपुरातील एका गावाने प्रत्यक्षात एक कल्पना राबवलीय. त्यामुळे गावातील प्रत्येक तरूणाला सरपंचपदाच्या खुर्चीत बसण्याची संधी मिळणार आहे. असा क्रांतिकारी निर्णय घेणारं गाव म्हणजे आंबोली. #Sarpanch #Adharnewsnetwork
हे आंबोली कोकणातील नाही तर चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात आहे. असा उपक्रम राबविणारी आंबोली ग्राम पंचायत ही महाराष्ट्रातील पहिली ग्राम पंचायत ठरली आहे. ग्रामपंचायत आंबोलीने ग्रामसभेत हा निर्णय घेतला आहे. प्रत्येक महिन्याला एक दिवस संपूर्ण गाव हे गावातीलच तरुण-तरुणी सरपंच, उपसरपंच, सदस्य बनून सांभाळतील आणि गावाचा कारभार बघतील.
जानेवारी 2021 ला 9 सदस्यीय ग्रामपंचायत निवडणूकीत आंबोली गावात पदवीधर पॅनेल मैदानात उतरले होते. त्यात सर्व उमेदवार हे पदवीधर होते. निवडणुकीत या पदवीधर पॅनेलचा विजय झाला आणि पदवीधर असलेले तरुण गावकारभारी झाले.
आंबोली गावच्या सरपंच शालिनी दोहतरे यासुद्धा पदवीधर आहेत. सर्व सदस्य उच्चशिक्षित आहेत. ग्रामपंचायत म्हटले की, त्यात गावातील ज्येष्ठ राजकारण्यांचा भरणा असतो आणि गावातील तरुण-तरूणींना संधी मिळत नाही. युवा वर्गाने घेतलेल्या शिक्षणाचा समाजाला, गावाला लाभ मिळत नाही. त्यामुळे गावातील तरुण-तरूणींच्या कल्पनांना वाव मिळावा आणि त्यांनासुध्दा ग्रामपंचायत कळावी.
सरपंच-उपसरपंच, सदस्य कार्यपद्धती समजावी, हा या निर्णयामागील उद्देश आहे. प्रत्येक महिन्याला गावातील तरुण-तरुणींची निवड करून त्यांच्याकडे एका दिवसासाठी गावाचा कारभार सोपवला जाईल. प्रत्यक्षात निर्णयप्रक्रियेत काम करायची संधीदेखील दिली जाणार आहे, असे उपसरपंच वैभव ठाकरे यांनी सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने