(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- तालुक्यातील मांगली(रै.) येथील गुराखी जंगलात गुरे चारायला गेला असता त्याला वाघाने फस्त केल्याची घटना आज दि.५ आॅगस्ट रोजी दुपारी २ वाजेदरम्यान उघडकीस आली.
मधुकर कोटनाके (५५) असे मृत गुराख्याचे नाव आहे. तो दि.३ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता गावालगतच्या एफ.डी.सी.एम.च्या जंगलात गुरे चारायला गेला होता. सायंकाळी गुरे घरी परत आली. परंतू मधुकर घरी परत आला नाही. त्यामुळे २५ ते ३० ग्रामस्थांचा ताफा मधुकरचा शोध घेण्यासाठी जंगलात रवाना झाला. सर्व दिशांनी शोध मोहीम राबविली. मात्र मधुकर कुठेही आढळून आला नाही. त्यानंतर वनविभागाला माहिती देण्यात आली. वनविभागाचे कर्मचारी आणि ग्रामस्थ मिळून परत दि.४ जुलै रोजी शोध मोहीम राबविण्यात आली. तरीही मधुकरचा ठावठिकाणा लागला नाही.
अखेर आज दि.५ आॅगस्ट रोजी दुपारी २ वाजताच्या दरम्यान निरगुडी पिंपळाच्या वळना जवळ मधुकरचे प्रेत मुंडके, हात, पाय शरीरापासून वेगळे झालेल्या अवस्थेत आढळून आले. वाघाने त्याच्या शरीराचे लचके तोडले होते. पोलिस व वनविभागाने घटनास्थळाचा पंचनामा करुन प्रेत शवविच्छेदनासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले होते. मधुकरच्या मृत्यूने संपूर्ण मांगली गावावर शोककळा पसरली आहे.#Tiger #attack