बालकांच्या आहाराबाबत नंदोरी येथे पोषण अभियानाला सुरवात.#Campaign

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्यानतंर आता सरकारकडून संभाव्य तिसऱ्या लाटेबद्दल खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका बालकांना असल्याने त्या लहान मुलांच्या पोषण आहाराबाबत मार्गदर्शन आणि जनजागृती केली जात आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरदरम्यान राष्ट्रीय पोषण महिना अभियान राबवले जात आहे.#Adharnewsnetwork


लहान मुलांसाठी योग्य पोषण आहार दिल्याने मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होणार आहे. तसेच या अभियानादरम्यान गरोदर माता आणि नागरिकांच्या लसीकरणावर भर दिला जाणार आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लहान बालकांना असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हा परिषदेकडून लहान मुलांची आणि गरोदर मातांची विशेष काळजी घेतली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत पहिल्या आठवड्यात अंगणवाडी, सार्वजनिक जागा आणि घराच्या मोकळ्या जागेत पोषण वाटिका, परसबाग तयार केल्या जाणार आहेत. यात विविध प्रकारच्या पालेभाज्यांच्या लागवडीबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. ज्यामुळे नैसर्गिकरित्या तयार झालेली आणि रसायनं, खतमुक्त भाजीपाला मिळेल.
तर दुसरीकडे लहान मुलांनी व गरोदर मातांनी रोज कोणता आहार खावा याचा डाएट प्लॅन दिला जाणार आहे. यात गाजर, बीट अशी कंदवर्गीय पिके, मेथी पालक आणि इतर पालेभाज्या, फळभाज्या, ताजी फळे यांचा समावेश असणार आहे. मुलांना लोह आणि विविध प्रथिने मिळणारे खाद्य रोजच्या आहारात समाविष्ट करण्यावरही भर दिला जाणार आहे. या अभियानादरम्यान ग्रामसेवक आणि आशा वर्कर यांच्या मदतीने प्रत्येक घरात जाऊन लहान मुलांची नोंद घेतली जाणार आहे. तसेच यावेळी त्यांच्या तब्येतीवर लक्ष दिले जाणार आहे.
विविध प्रकारची खते, रसायन आणि दूषित हवेमुळे कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. रासायनिक खतांचा आणि कोणत्याही फवारणीचा वापर न करता पारस बागेत भाजीपाला पिकवला जाणार असून तो घरी खाण्यासाठी वापरला जाणार आहे. त्यामुळे या माध्यमातून जिल्हा कॅन्सरमुक्तीचा संकल्प करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य सौ अर्चना नरेंद्र जिवतोडे यांनी दिली.#Campaign