Top News

गडचिरोली पोलिसांनी केला नक्षलवाद्यांचा मोठा कॅम्प उध्वस्त. #police


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
गडचिरोली:- गडचिरोली पोलिस दलाने छत्तीसगडच्या सीमेलगतच्या अबुजमाड भागातील कोपशी व फुलनार या गावाजवळच्या जंगलात नक्षलवाद्यांचे शिबिर रविवारी उद्ध्वस्त केले. त्यामुळे नक्षलविरोधी लढ्यात पोलिस विभागाचे पारडे पुन्हा जड झाले आहे.
भामरागड उपविभागाअंतर्गत येणाऱ्या कोठी पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील कोपशी व फुलनार जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी शिबिर लावले असून, त्यांची घातपाताची योजना असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे विशेष अभियान पथकाचे जवान रवाना करण्यात आले. रविवारी दुपारी ४.३० ते ७ वाजता दरम्यान कंपनी १० व भामरागड दलमच्या नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. जवानांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला असता नक्षलवाद्यांनी पळ काढला. जवानांनी पाठलाग केला असता पुन्हा नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला. तिथूनही नक्षल्यांनी पळ काढला.
यानंतर जवानांनी शोध अभियान राबविले असता नक्षलवाद्यांचे शिबिर असल्याचे दिसून आले. घटनास्थळावरून आयईडी व नक्षल साहित्य हस्तगत करण्यात आले. आयईडी जागेवरच नष्ट करण्यात आले. अपर पोलिस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक अहेरी अनुज तारे, पोलिस उपअधीक्षक (अभियान) भाऊसाहेब ढोले, सी- ६० प्राणहिताचे प्रभारी अधिकारी योगीराज जाधव यांनी अभियान यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने