जाहिरात... Advertisement... विज्ञापन

सावली तालुक्यात पशु विभागाकडून जनावरांची बोगस खरेदी दाखवून लाखों रुपयांची अफरातफर. #Saoli #saolinews

सभापती विजय कोरेवार यांची तक्रार.
(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) पौर्णिमा फाले, सावली
सावली:-  दूध उत्पादनाला चालना देण्यासाठी व लोकांना स्वरोजगार मिळावा यासाठी शासनाने अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत लाभ मंजूर केला मात्र पशु संवर्धन विभागाचे अधिकारी व लाभार्थी यांचे संगनमताने जनावरे खरेदी न करता खरेदी दाखवून अनुदान लाटत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे उघडकीस आल्याने पशुधन विकास अधिकारी डॉ ज्ञानेश्वर कापगते  यांचेवर  कारवाई करण्यासाठी सावली पंचायत समितीचे सभापती विजय कोरेवार यांनी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त चंद्रपूर यांचेकडे तक्रार केली आहे.
     
       अनुसूचित जमातीच्या व्यक्तींना स्वयंरोजगार करता यावा व राज्यात दुध उत्पादनात वाढ व्हावी या उद्देशाने पशु संवर्धन विभागाकडून नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत सावली तालुक्यात प्रति लाभार्थी 2 दुधाळ जनावरे खरेदीसाठी 6 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली तर प्रत्येकी 11 नग बकरी गटासाठी 6 लाभार्थ्यांची निवड झाली. योजनेचे स्वरूप 25 टक्के लाभार्थी हिस्सा तर 75 टक्के शासनाकडून अनुदान स्वरूपात खरेदीनंतर अनुदान दिल्या जाते. लाभार्थ्यांना बाजारातून जनावरे खरेदी करायची असतात. तालुक्यातील 12 लाभार्थी पैकी 10 लाभार्थ्यांनी खरेदी केल्याची प्रक्रिया दाखवून पशुधन विकास अधिकारी डॉ कापगते यांनी अनुदान मिळवून दिले. मात्र कोणतीही खरेदी न करता पशुधन विकास अधिकारी व लाभार्थ्यांनी संयुक्तरित्या बोगस जनावरे दाखविल्याची शंका पंचायत समिती सभापती विजय कोरेवार यांना आली. त्यांनी प्रत्यक्ष गावात जाऊन लाभार्थ्यांचे घरी चौकशी केली असता त्यांचेकडे कोणतीही जनावरे आढळली नाही. 
       
         उसरपार तुकुम येथील 4 लाभार्थी प्रत्येकी 2 म्हशी खरेदी केल्याचे दाखवले आहे परंतु त्यांचेकडे प्रत्यक्षात जनावरे नाही. 3 लाभार्थ्यांनी उसरपार चक येथे जनावरे असल्याचे सांगितले तर एक लाभार्थ्यांनी पालेबारसा येथे जनाबरे असल्याचे सांगितले मात्र त्यांच्याकडेही चौकशी केली असता लाभार्थ्यांची जनावरे नाही. जनकापूर येथे सभापती हे सरपंच इंबाजी चौधरी व ग्रामपंचायत पदाधिकारी यांचेसह गृहचौकशी केली असता म्हशीचे लाभार्थीने  त्यांची जनावरे उसरपार येथे असल्याचे सांगितले. 
           
        जनकापूर येथे बकरी गटाचे 4 लाभार्थ्यांनी कागदावर लाभ घेतले आहे परंतु प्रत्यक्षात एकही लाभार्थ्यांनी बकरी खरेदी केली नाही. दुसऱ्याचे गोठयात असलेल्या बकऱ्या लाभार्थ्यांनी दाखविल्या मात्र बकरी मालकांनी हे माझेच असल्याचे सभापती यांना संगितले.  गावातीलच दुसऱ्यांचे बकरे खरेदी दाखवून,  बोगस बिले सादर करून, नातेवाईकांच्या नावाने विक्रेते दाखवले आहेत. या प्रकरणात शासनाच्या उद्देशाला हरताळ पासून डॉ ज्ञानेश्वर कापगते यांनी बोगस खरेदी प्रक्रिया राबवून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे सदर डॉक्टरवर कारवाई करण्यात यावी अशी लेखी तक्रार पशु संवर्धन उपायुक्त चंद्रपूर यांचेकडे केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत