लाच घेतांना महिला रेल्वे पोलीस बलाच्या अधिकाऱ्याला अटक. #Arrested #CBI

Bhairav Diwase

वरोऱ्यात सीबीआयची धाड.
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- कारवाईदरम्यान जप्त केलेले साहित्य सोडण्यासाठी व कोणतीही कारवाई न करण्यासाठी ६० हजार रुपयांची लाच स्वीकारताना वरोरा रेल्वे पोलीस फोर्सच्या पोलीस उपनिरीक्षकास नागपूर सीबीआय एसीबीच्या पथकाने बुधवारी रात्री रंगेहाथ अटक केली.
गोपिका मानकर असे अटकेतील लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. दीड महिन्यातील सीबीआय एसीबीची चंद्रपूर जिल्ह्यातील ही दुसरी कारवाई आहे. तक्रारदाराचे भद्रावती येथे नेट कॅफेचे दुकान आहे. यामध्ये रेल्वे तिकीट बुकिंगसह ऑनलाईन कामे केली जातात.
या कॅफेमध्ये वरोरा आरपीएफ पोलीस फोर्सच्या पोलीस उपनिरीक्षक गोपिका मानकर यांनी धाड टाकून संगणक, डोंगल यासह इतर साहित्य जप्त केले होते. ते साहित्य सोडविण्यासाठी व कोणतीही कारवाई न करण्यासाठी मानकर यांनी एक लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीनंतर ६० हजार रुपये देण्याचे कबूल झाले. मात्र तक्रारदाराने याबाबतची तक्रार नागपूर सीबीआय एसीबीकडे केली. पोलिसांनी सापळा रचून बुधवारी रात्री मानकर यांना रंगेहाथ अटक केली.
ही कारवाई नागपूर सीबीआय एसीबीचे पोलीस अधीक्षक एम.एस. खान यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक कल्याणी हुमणे, पोलीस निरीक्षक नीरज कुमार गुप्ता, पोलीस निरीक्षक कविता इसरकर, पोलीस उपनिरीक्षक विनोद कराले, डब्ल्यूपीसी कोमल गुजर, संदीप धोबळे, पीसी सी.एम. बांगडकर, कार्ती बावनकुळे, पीसी राजेश डेकाटे यांनी केली.