१३ ऑक्टोबरला बरांज कोळसा खाण बंद पाडणार. #Chandrapur

Bhairav Diwase

चंद्रपूर:- बरांज कोळसा खाणीच्या प्रकल्पग्रस्तांवर मोठा अन्याय होत असून, मध्यस्थी असलेले जिल्हा प्रशासनही बघ्याची भूमिका घेत आहे. स्थानिकांना आणि प्रकल्पग्रस्तांना काम दिले जात नसून, परप्रांतातील कामगार खाणीत काम करीत आहेत. ज्या प्रकल्पग्रस्तांना काम मिळाले, त्यांना मात्र डिसेंबर 2020 पासून एक रूपयाही पगार दिला गेला नाही. वारंवार बैठका झाल्या. परंतु, कंपनी आणि जिल्हा प्रशासनाची भूमिका नकारात्मकच आहे. त्यामुळे आता येत्या 13 ऑक्टोबर रोजी लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात ही खाण बंद पाडू, असा गंभीर इशारा भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे आणि त्यांच्या सहकार्‍यांसह प्रकल्पग्रस्त तथा पंसचे सभापती प्रविण ठेंगणे यांनी दिला आहे.
बंराज खुल्या कोळसा खाण प्रकल्पात व कंत्राटी कंपन्यांमध्ये शेकडो कामगार हे बाहेर राज्यातील आहेत. त्यामुळे स्थानिक जिल्ह्यातील बेरोजगार युवकांवर फार मोठा अन्याय झाला आहे. त्याकरिता या प्रकल्पात किमान 80 टक्के कामगार स्थानिक म्हणजेच प्रकल्पग्रस्त व चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असावेत. बराज मो. व चेकबंराज या दोन्ही गावांच्या ग्रामपंचायत नोंदीनुसार तसेच केंद्र व राज्य सरकारच्या अद्यावत पुनर्वसन धोरणानुसार दोन्ही गावांचे तात्काळ पुनर्वसन करून नमुद तरतुदीनुसार आर्थिक मोबदला देण्यात यावा. प्रकल्पबाधित कुटुंबातील व्यक्तीला कायमस्वरूपी नोकरीमध्ये तात्काळ सामावून घेणे किंवा त्याऐवजी आर्थिक मोबदला देण्यात यावा अशा प्रमुख मागण्या आंदोलकांच्या आहेत.
तसेच पूर्वीचे कार्यरत प्रकल्पग्रस्त व स्थानिक कामगांराना सुधारित नियुक्तीपत्र देण्यात यावे, माहे एप्रिल 2015 पासुनचे थकित वेतन अदा करावे, नविन वेतन निर्धारण करून माहे डिसेंबर 2020 पासूनचे थकीत वेतन अदा करावे, नियमानुसार कामगांराना मिळणार्‍या मोफत सुविधा पुरवाव्या. कंपनी प्रशासनाने एकूण संपादित जमिनीपैकी 50 टक्के शेतजमिन कृषी योग्य करून 7 वर्षानंतर शेतकर्‍यांना परत करण्याचे मान्य केलेले असून, त्यानुसार कार्यवाही करावी किंवा त्याऐवजी आजच्या बाजार मुल्यानुसार शेतजमिनीची एकमुस्त आर्थिक मोबदला देण्यात यावा, अशाही मागण्या करण्यात आल्या आहेत.
बंराज मो. व चेकबंराज या दोन्ही गांवाचे पुनर्वसन होत असल्यामुळे व तेथील 95 टक्के शेती व सरकारी रस्ते व कंपनीने संपादित केल्यामुळे त्या ठिकाणी शेतकर्‍यांना शेती करणे शक्य नाही. त्यामुळे उर्वरित शेतजमिन कंपनी प्रशासनानी तात्काळ संपादित करावी व शेतकर्‍यांना किंवा त्यांच्या वारसदारांना प्रकल्पात नोकरीत सामावून घेण्यात यावे. खाण प्रकल्पात कार्यरत कंत्राटी कंपन्यामध्ये उर्वरित बेरोजगार प्रकल्पग्रस्तांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. तसेच प्रकल्पात उपलब्ध असणार्‍या स्वयम रोजगाराच्या संधीमध्ये प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य देण्यात यावे, असे प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे आहे.
या सर्व मागण्या रास्त असून, स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकरी, कामगार व जिल्ह्यातील बेरोजगार युवक यांच्या हिताच्या आहेत. तरी सर्व प्रकल्पग्रस्त शेतकरी तथा बेरोजगार युवकांनी हजारोंच्या संख्येने आंदोलनात उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे भाजपा महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, प्रकल्पग्रस्त तथा पं. स. सभापती प्रवीण ठेंगणे, भद्रावतीचे तालुका महामंत्री नरेंद्र जिवतोडे, जि. प. सदस्य यशवंत वाघ, जि. प. सदस्य प्रवीण सुर, बरांजच्या सरपंच मनिषा ठेंगणे, उपसरपंच रमेश भुक्या यांनी केले आहे.