जादुटोणा मानसिक बिमारी आहे,सर्वांनी वैद्यानिक दृष्टीकोन अंगिकारा:- ठाणेदार जोशी #Pombhurna

Bhairav Diwase
अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमात मार्गदर्शन
पोंभूर्णा:- पोंभूर्णा पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गावांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी तसेच भानामती, करणी, चमत्कार या मानसिक बिमारीतून नागरिकांनी बाहेर निघावे यासाठी पोंभूर्णा पोलिस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन समिती च्या माध्यमातून जादुटोणा विरोधी कायदा आणि अंधश्रद्धा निर्मूलन प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ठाणेदार धर्मेंद्र जोशी, प्रमुख पाहुणे म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अनिल दहागावकर, धनंजय तावाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

ग्रामिण भागात अघोरी प्रथा व जादुटोण्यावर मोठा विश्वास आहे.गावकरी वैद्यकीय उपचार पद्धती पेक्षा करणी,टोटके यावर विश्वास ठेवून असतात. त्यामुळे अनेकदा विपरीत परिणामांना सामोरे जावे लागते.अनेकांनी अघोरी प्रथेमुळे जीवही गमवला आहे. हि अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी पोंभूर्णा पोलिस ठाण्यात अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीने प्रबोधनपर कार्यक्रम घेण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी अनेक उदाहरणे देत अघोरी प्रथा व बळी प्रथा यावर मार्गदर्शन केले.नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट तसेच अघोरी प्रथा, जादुटोणा प्रतिबंध आणि उच्छाटण कायदा, जादुटोणा विरोधी कायदा, व्यसनमुक्ती, चमत्कार आणि त्यातील सत्य याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन व त्याचे वैद्यानिक दृष्टीकोन यावर सप्रयोग व्याख्याने देखील झालीत. सोबतच अंगात येणे, भुताने झपाटने,भूत काढणे,निंबूतून करणी काढणे,नारडातून कापड काढणे,जिंभेत त्रिशूल भोसकणे, अग्नीकुंड लावणे, अंगात आल्यानंतर जळता कापूर खाणे,यासह अन्य विषयांवर चमत्कार सादर करून त्यामागील विज्ञान समजावून सांगण्यात आले.पर्यावरणपुरक व वैद्यानिक दृष्टीकोन कसा अंगिकारावा याबाबतची माहितीही यावेळी देण्यात आली.

यावेळी पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ३४ गावातील सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील, महिला दक्षता समितीचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलिस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.