Top News

गोवरी-पोवनी मार्गावर नागरिकांचा जीवघेणा प्रवास. #Rajura

जीवघेण्या खड्ड्यांमुळे अपघात.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष.

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- गोवरी-पोवनी मार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने नागरिकांना या मार्गावर नरकयातनाचा प्रवास करावा लागत आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे लक्ष देत नसल्याने अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने हा मार्ग नव्हे तर नाल्यातून प्रवास करीत असल्याची अनुभूती नागरिकांना येत आहे.
रस्ते देशाच्या विकासाचे प्रतिक आहे.स्मार्ट सिटीने शहरे सजली असतांनाच ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था खूप बिकट झाली आहे. राजुरा तालुक्यातील गोवरी, पोवनी,साखरी मार्गावर वेकोलीतून कोळसा घेऊन जाणारे ट्रक रात्रंदिवस चालत असतात.या अवजड वाहनांमुळे या मार्गावर ठिकठीकाणी मोठे खड्डे पडल्याने वाहनधारक व नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
मात्र याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नसल्याने अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाल्याने खड्डे चुकविण्याच्या नादात अनेकदा या मार्गावर मोठे अपघात झाले आहे.या मार्गाच्या रस्त्याचे काम अजूनही सुरू झाले नाही. गोवरी, पोवनी गावाजवळ तर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. राजुरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात भूमिगत व खुल्या कोळसा खाणी आहेत. गोवरी डीप, पोवनी-०२ या वेकोळीच्या कोळसा खाणीतून दिवसरात्र कोळसा वाहतूक सुरू आहे.या ओव्हरलोड वाहतुकीने रस्त्यांचे बारा वाजले आहेत.याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.त्यामुळे रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

गोवरी-पोवनी मार्ग नव्हे नाल्यातून प्रवास.....?

राजुरा तालुक्यातील गोवरी_पोवनी मार्गाने कुणी प्रवास करीत असेल तर प्रवास करणाऱ्या नागरिकांना आपण रस्त्याने नव्हे तर नाल्यातून प्रवास करीत असल्याची अनुभूती येत आहे.चारचाकी वाहने तर सोडाच पण दुचाकी वाहन या रस्त्यावरून कसे चालवायचे ? असा प्रश्न वाहनधारकांना पडला आहे.रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था होऊनही सद्यस्थितीत लोकप्रतिनिधी या मार्गाकडे लक्ष देत नसल्याने या रस्त्याचा कुणीच वाली नाही का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
खड्डे चुकविण्याच्या नादात होतात अपघात........

[ गोवरी_पोवनी मार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने या खड्ड्यात पावसाचे पाणी भरून राहत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज घेता येत नाही. खड्डे चुकविण्याच्या नादात या मार्गावर अनेकदा अपघात झाले आहे.
रस्त्याचे काम मंजूर आहे.परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे काम सुरू केले नाही. रस्त्यावर खड्डे पडल्याने अशा खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटनेत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.#Rajura

भूषण जुनघरी,युवा कार्यकर्ता, गोवरी

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने