शेतकऱ्यांना सोलर फेनसिंग देऊन वन्यजीव सप्ताहाची सांगता. #WildlifeWeek #Solarfencing

Bhairav Diwase

घनोटी तुकूम येथील ४५ शेतकऱ्यांना मिळाला लाभ .

डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेचा शुभारंभ.
पोंभूर्णा:- पोंभूर्णा वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या घनोटी तुकूम येथील जंगलाला लागून असलेल्या शेतकऱ्यांचे वन्यजीवांपासून शेतीचे नुकसान होऊ नये यासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजने अंतर्गत सोलर फेनसिंग संयंत्र देऊन वन्यजीव सप्ताहाची सांगता करण्यात आली.
वाघ-बिबट्यांचे वारंवार हल्ले व डुकरामुळे व्यक्ती व शेतीचे नुकसान होत असलेल्या जंगल लगतच्या संवेदनशील गावांना
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजने अंतर्गत सोलर फेनसिंग संयंत्र देण्याच्या संबंधाने वनविभागाच्या वतीने नियोजन करण्यात आले. यावेळी पोंभूर्णा वनपरिक्षेत्रातील घनोटी तुकूम या गावाची योजनेसाठी निवड करण्यात आली.
या योजनेतून जन- जल- जंगल- जमीन या संसाधनांचा शाश्वत विकास साधून उत्पादकता वाढविणे, ग्रामस्थांची जंगलावरील निर्भरता कमी करून शेतीपूरक व्यवसायाला चालना देणे आणि त्या माध्यमातून मानव व वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष टाळता यावे यासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना राबविण्याच्या अनुषंगाने पोंभूर्णा तालुक्यातील जंगलालगत असलेल्या घनोटी तुकूम या गावाची सोलर फेनसिंग संयंत्र वितरण योजनेसाठी निवड करण्यात आली.
संयंत्राच्या एकूण खर्चाच्या किंमतीतील २५ टक्के रक्कम लाभार्थी व ७५ टक्के रक्कम वनविभागाकडून भरण्यात आले. घनोटी तुकूम येथील ४५ शेतकऱ्यांना या योजनेसाठी पात्र करण्यात आले.
वन्यजीव सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमाचे औचित्य साधून योजनेतील पाच शेतकऱ्यांना सोलर फेनसिंग संयंत्राचे वितरण करून योजनेचा शुभारंभ करण्यात आला. तर यापैकी मोहन कोडापे, ओमप्रकाश दुधबळे या शेतकऱ्यांचे संयंत्र प्रत्याक्षिक म्हणून लावून देण्यात आले.
यावेळी मध्य चांदाचे उप वन संरक्षक अरविंद मुंडे, सहाय्यक वन संरक्षक मिलीश शर्मा,वनपरिक्षेत्र अधिकारी आम्रपाली खोब्रागडे, पोंभूर्णा क्षेत्र सहाय्यक ए.एस.कोसरे, घोसरी क्षेत्र सहाय्यक अजय बोधे, संयुक्त वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष कालिदास उईके, वनरक्षक अजय ढवळे, प्रशांत शेंडे, दुषांत रामटेके, सुरेंद्रकुमार देशमुख, सुरज मेश्राम, राजेंद्र मेश्राम, विनायक कस्तुरे, शितल कुळमेथे, मिनाक्षी सातपुते व वनकर्मचारी उपस्थित होते.