आता कुठे गेला राष्ट्रवादीच्या नेत्यांचा एसटी कर्मचाऱ्यांबद्दलचा पुळका? #Chandrapur


चंद्रपूर:- केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन, भत्ते राज्यातील एस.टी.च्या कर्मचाऱ्यांना मिळावे, यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकेकाळी आग्रही होते. सभागृहात त्यांनी यासाठी आक्रमक भाषणेही केलेली आहे. पण आज स्वतः सत्तेत असताना एस.टी. कर्मचाऱ्यांसाठी ते काहीही करताना दिसत नाही. आता कुठे गेला त्यांचा एसटी कर्मचाऱ्यांबद्दलचा पुळका, असा सडेतोड सवाल राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विचारला आहे.
राज्य सरकारने अन्याय केलेले राज्य परिवहन महामंडळाने कर्मचारी एका पाठोपाठ एक आत्महत्या करीत आहेत, हे सरकारला दिसत नाही का? त्यांना दिलासा देण्याऐवजी हे लोक जुने पुराने व्हिडिओ अन् तेसुद्धा अर्धवट सोशल मिडियावर व्हायरल करण्यात गुंतले आहेत. आता यांचेच जुने व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यावर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी उत्तर द्यावे आणि एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपावर तोडगा काढावा. अन्यथा कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय आणि जनता या सरकारला माफ करणार नाही, असे आमदार मुनगंटीवार म्हणाले.
एसटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला पंधरवडा पूर्ण होत आला आहे. या कामगारांची दिवाळी तशीच अंधारात गेली. अशा स्थितीत सरकारला असलेल्या अधिकारांच्या जोरावर, या समस्या शासकीय पातळीवर सोडविण्याची गरज असताना, मंत्र्यांसह सारी यंत्रणा जुन्या व्हिडिओ क्लिप व्हायरल करून गैरसमज पसरविण्यात गुंतलेली दिसते आहे. हे चित्र अतिशय दुर्दैवी आहे. जुन्या व्हिडिओ क्लिपच काढायच्या असतील तर शरद पवार, धनंजय मुंडे यांनी कधीकाळी केलेल्या मागण्या, एसटी कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी सुचविलेल्या उपाय योजना, यांचीही जुनी वक्तव्ये ऐकता येतील. तीच सारी मंडळी आता सत्तेत आहे, असे आमदार मुनगंटीवार म्हणाले.
आता राज्य सरकारने एस.टी. कर्मचारी आणि जनतेला अधिक वेठीस न धरता, वेळ न गमावता आणि अधिक आत्महत्या होण्याची वाट न बघता तात्काळ या संपावर तोडगा काढावा. जनतेचे आणि महामंडळाचे होणारे नुकसान टाळावे, अशीच आमची मागणी आहे. त्यासाठी सरकारला काही सहकार्य लागत असेल तर आम्ही तयार आहोत. सरकारने संकोच न करता पुढाकार घ्यावा. आम्ही त्यांच्यासाठी तत्पर असू, असेही आमदार मुनगंटीवार यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत