Top News

पोलीस कारवाईत २६ नाही तर २७ नक्षलवादी ठार. #Gadchiroli


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
गडचिरोली: महाराष्ट्र पोलिसांच्या सी ६० पथकाने महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर गडचिरोली जिल्ह्यातील जंगलात केलेल्या कारवाईत २६ नाही तर २७ नक्षलवादी ठार झाले आहेत. कारवाई संपल्यानंतर जंगलात सुरू केलेल्या शोध मोहिमेत आतापर्यंत २७ नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांच्या हाती आले आहेत. नियमानुसार नक्षलवाद्यांची ओळख पटवून त्यांचे मृतदेह कुटुंबियाच्या हाती सोपविण्याचे काम सुरू आहे.
पोलीस कारवाईत मिलिंद तेलतुंबडे, जोगन्ना, विजय रेड्डी, संदीप दीपकराम आणि सुखलाल या प्रमुख नक्षलवादी नेत्यांसह २७ नक्षलवादी ठार झाले. ही कारवाई करणाऱ्या पोलिसांच्या सी ६० पथकाला जिल्हा नियोजन फंडातून ५१ लाख रुपयांचे बक्षिस देण्याचा निर्णय झाला आहे. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी संजय मीणा यांना तसे निर्देश दिले आहेत.
सुखलाल या नक्षलवाद्यावर २५ लाखांचे बक्षिस होते. जांभुळखेडा येथील स्फोटात सुखलालचा हात होता. चकमकीचे २० आणि हत्यांचे १६ गुन्हे सुखलालवर दाखल होते. वेगवेगळ्या ५१ गुन्ह्यांमध्ये पोलीस सुखलालला शोधत होते.
पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईमुळे नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवाया थंडावल्या आहेत. नक्षलवाद्यांविरुद्धची मोहीम आणखी प्रभावी करण्यासाठी पोलीस लवकरच आणखी एक विशेष मोहीम राबवणार असल्याचे समजते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने