💻

💻

त्याग, धैर्य, शौर्य म्हणजे "सी-६०" #C-60


गडचिरोली:- 12-13 नोव्हेंबरला माओवाद्यांशी झालेल्या चकमकीत सी-60 जवानांनी नऊ तास झुंज देऊन 27 माओवाद्यांना ठार केले. ठार माओवाद्यांमध्ये केंद्रीय समितीचा सदस्य तथा महाराष्ट्र, मध्य प्रदेश व छत्तीसगडची जबाबदारी असलेला मास्टरमाइंड मिलिंद तेलतुंबडे यांचा समावेश आहे.
छत्तीसगड महाराष्ट्र सीमेवर मर्दिनटोला जंगलातील चकमकीत पोलिसांकडून तीनशेवर कमांडो सहभागी झाले होते तर शंभरपेक्षा अधिक माओवादी गोळीबार करीत होते. नंतर बाकीचे पळून गेले. माओवाद्यांकडून 5 एके 47, एक एकेएम युबिजिअल, नऊ एसएलआर रायफल, तीन 303 व इतर साहित्य जप्त करण्यात आले. माओवादी जंगल परिसरातीलच राहणाऱ्या लोकांना भरती करतात.
त्यामुळे माओवाद्यांविरोधात लढण्यासाठी तेथील भाषा, रस्ते इत्यादी गोष्टीही माहिती असणारे जवान आपल्याकडे असणे गरजेचेच. त्यातूनच 1990 सालाच्या सुमारास 'सी-60'ची संकल्पना उदयास आली. हे याच जंगल परिसरातील तरुण मुले आहेत. त्यांचे नातेवाईक जंगलातच राहणारे, तिथलीच भाषा बोलणारे आणि तिथले रस्ते ओळखणारे असतात. म्हणून त्यांना जंगलातील प्रत्येक कोपऱ्याची माहिती असते.
माओग्रस्त प्रभावित क्षेत्रातील तरुणांची निवड करून, 1990 साली 'सी-60′ ची पहिली तुकडी तयार करण्यात आली. त्यावेळी 60 जणांचा पहिल्या तुकडीत समावेश होता, म्हणून 'सी-60′ असे नाव पडले होते. पुढे तुकडीतील जवानांची संख्या वाढली, तरी नाव 'सी-60′ राहिलं. 'सी-60'च्या जवानांना खास जंगलातील कारवायांसाठी प्रशिक्षण दिले जाते.
त्यामुळे जंगलातून वजनदार शस्त्र घेऊन किंवा जखमी साथीदारांना घेऊन फिरणं, हे नेहमीचंच आहे. 'सी-60′ च्या जवानाला स्वत:चं नाव उघड न करण्याचे बंधन आहे. कारण कुटुंबीयांना कायम माओवाद्यांकडून धोका असतो. एक 'सी-60′ जवान गावातून या फोर्समध्ये गेला म्हणून माओवाद्यांनी त्याचे वडील, मोठा भाऊ, काका आणि चुलतभाऊ अशा अनेकांची हत्या केली, उभ्या पिकावर ट्रॅक्‍टर चालवलं.
शेकडो 'सी-60′ जवान असे आहेत ज्यांच्या घरातील एका तरी व्यक्‍तीची ते या फोर्समध्ये गेले म्हणून माओवाद्यांनी हत्या केली. या फोर्समध्ये भरती तर झाले, पण त्यांच्या उरलेल्या परिवाराला आपापली गावं आणि जमिनी सोडून पळावं लागलं आहे. त्याग आणि धैर्य, शौर्य याचं उदाहरण म्हणजे 'सी-60′ आहे. 'सी-60′ जवानांना जंगलातील चकमकीसाठी प्रशिक्षित केले जाते.
या जवानांना हैदराबादमधील ग्रे-हाउंड्‌स, मानेसरमधील एनएसजी आणि पूर्वांचलमधील आर्मीच्या जंगल वॉरएअर स्कूलमध्ये ट्रेनिंग दिले जाते. त्यांना विशेष शस्त्रे दिली जातात.
1994 साली सी-60 च्या दुसऱ्या मुख्यालयाची स्थापना झाली. सी-60 चा प्रत्येक जवान हा आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील माओ चळवळीला आळा घालण्यासाठी अथक परिश्रम करीत आहे.
प्रशिक्षित सी-60 येथील जवान कठोर परिश्रम घेऊन गडचिरोली जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन पहाडी व अतिदुर्गम भागामध्ये माओ विरोधी अभियान राबवितात. दरम्यान, माओ चळवळीमध्ये असणाऱ्यांच्या परिवाराला व नातेवाइकांना भेटून त्यांना आत्मसमर्पणबाबत विविध शासकीय सुविधा व योजनांचे मार्गदर्शन करून त्यांचा लाभ घेण्यास त्यांचे मन परिवर्तन करून त्यांना लोकशाहीच्या, विकासाच्या प्रवाहात सहभागी होण्यास प्रवृत्त करतात. दुर्गम भागामध्ये जाऊन जनसंपर्क साधून शासनांचे विविध धोरण लोकांसमोर मांडून त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम 'सी-60′ योग्यरित्या पार पाडत आहे.
'सी-60′ पथके रिझर्व्ह असताना शारीरिकदृष्ट्या सक्षम राहण्याकरिता दररोज सकाळी शारीरिक व्यायाम, कवायत व सांघिक खेळ घेतले जातात. तसेच त्यांना माओ विरोध अभियान राबविणे करिता वेळोवेळी माओ टॅक्‍टीस बद्दलची माहिती दिली जाते. तसेच त्यांना नैतिक व मानसिक मनोबल वाढविण्यासाठी मोटिव्हेशन लेक्‍चर, कमांडो मुव्हिज दाखविण्यात येते.
सी-60 पथकाला अति दुर्गम, संवेदनशील व पहाडी भागात ऊन, वारा, पाऊस, दिवस व रात्री येणाऱ्या आव्हानांना व समस्येला तोंड देण्यासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी त्यांना उच्च, विशेष व आधुनिक तंत्रज्ञानाच्या पद्धतीचे प्रशिक्षण विविध राज्यातील प्रशिक्षण संस्थेमध्ये दिले जाते. जवानांना अतिशय खडतर प्रशिक्षणासाठी यूओटीसी नागपूर पाठविले जाते. त्यांना इथे जे प्रशिक्षण दिले गेले त्यामध्ये स्मॉल टीम्स ऑपरेशनचे प्रशिक्षण हे महत्त्वाचे होते.
असे बघितले गेले आहे की, माओवादी भागात पोलीस हे रक्षात्मक पद्धतीने ऑपरेशन करतात. अर्धसैनिक दले आक्रमक कारवाई करण्यास फारशी तयार नसतात. सी-60ची सगळी ऑपरेशन ही अत्यंत आक्रमक आणि धोकेदायक होती आणि आहेत. याकरता उत्तम दर्जाचे ट्रेनिंग जरुरी आहे. स्वतःवरती, स्वतःच्या शस्त्रावरती, सहकाऱ्यांवर आणि स्वतःच्या नेतृत्वावरती विश्‍वास असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तरच अशा कठीण ऑपरेशनमध्ये विजय मिळू शकतो.
सी-60 ने केलेल्या या ऑपरेशनचे नियोजन उत्तम होते, गुप्तहेर माहिती अचूक होती. लष्करी डावपेच उत्तमरित्या वापरले गेले. फायरिंग डिसिप्लिन उत्कृष्ट दर्जाची होती. दाखवलेले नेतृत्व, शौर्य, धैर्य आणि कठीण परिस्थितीमध्ये जिंकण्याची मानसिकता उत्तम दर्जाची होती.
चकमकीत ठार झालेल्या माओवाद्यांमध्ये एक कोटी 36 लाखांचे बक्षीस असलेल्याचा समावेश आहे. हे बक्षीस सी-60 जवानांना त्वरित मिळवून दिले पाहिजे.
सी-60 कमांडोजना प्रत्येक ऑपरेशननंतर पुरेशी विश्रांती दिली जावी. त्यांचे काम उच्च दर्जाचे आहे, म्हणून त्यांना पुन्हा पुन्हा जंगलात पाठवू नये. इतर पोलीस दलांनीसुद्धा त्यांच्यावर असलेला भार सांभाळावा. त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षित जागी हलवले जावे. गडचिरोलीमध्ये तैनात असलेल्या अर्धसैनिक दलांनी अधिक आक्रमक व्हावे. छत्तीसगड, ओडिशा, झारखंडमधील सुरक्षा दलांनीसुद्धा आक्रमक कारवाई करून अबुजमाड जंगलात असलेले माओवाद्यांचे ट्रेनिंग कॅम्प उद्‌ध्वस्त करावेत. यापूर्वीही सी-60 ला यश मिळत आलेले आहे. पण आजचे यश त्या साखळीत सर्वात उजवे आहे. #साभार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत