लाचखोर विस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात. #Gondpipari

Bhairav Diwase

जन्म दाखल्यासाठी मागीतली अडीच हजारांची लाच.
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- जन्म दाखल्यासाठी पैशाची मागणी करणाऱ्या गोंडपिपरी पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. सोमवारी ( 8 नोव्हेंबर 21) रोजी दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील वेडगाव येथील एका नागरिकाला जन्म दाखल्याची आवश्यकता होती. त्याकरिता त्याने पंचायत समिती कार्यालयातील विस्तार अधिकारी संजीव इनमुलवार यांच्याकडे रितसर अर्ज सादर केला होता. बरेच दिवस होउनही दाखला देण्यात आलेला नाही. सदर व्यक्तीने वारंवार विचारणा केली. परंतु विस्तार अधिकाऱ्याने दाखला दिलेला नाही. सदर व्यक्तीकडून दाखल्यासाठी अडीच हजार रूपयाची मागणी विस्तार अधिकारी इनमुलवार यांनी केली. तक्रारकर्त्याची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर (एसीबी) यांचेकडे तक्रार दाखल केली.
दरम्यान आज सोमवारी या प्रकरणी सापळा रचून अडीच हजार रूपयाची लाच घेतांना विस्तार अधिकारी संजीव इनमुलवार याला रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणाची पुढील कारवाई एसीबीचे झांबरे यांच्या मार्गदर्शनात बरडे करित आहेत.